चिपळूण शहर : चिपळूण नगर परिषदेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापनेनंतर आता स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपकडून पेठमाप प्रभागाच्या नगरसेविका रूपाली दांडेकर यांची वर्णी लागणार आहे. ही निवड प्रक्रिया 12 जानेवारी रोजी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात दुपारी 2 वा. होणार असल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठांकडून देण्यात आली.
चिपळूण नगर परिषदेवर बऱ्याच वर्षांनी शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश सकपाळ विराजमान झाल्यानंतर आता उपनगराध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका रूपाली दांडेकर यांची वर्णी लागणार आहे. या पदासाठी आणखी काही नावांची चर्चा होती. मात्र, अनुभव, पक्षनिष्ठा, नगर परिषदेतील कामगिरी लक्षात घेता भाजपकडून दांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी दांडेकर यांचे अभिनंदन केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नगर परिषद निवडणूक प्रभारी व नेते प्रशांत यादव यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.