

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव यांना धक्का दिला आहे. गुहागर मतदार संघात दोन पक्षप्रवेश कार्यक्रम घेतले. यामध्ये शिवसेनेचे माजी सभापती व माजी तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण, उद्योजक वसंत उदेग, उपतालुकाप्रमुख महादेव मोरे व लक्ष्मण कोकमकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्योगमंत्री सामंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यापुढे विकास कामांची जबाबदारी माझ्यावर सोडा असे आश्वासन दिले.
तालुक्यातील नारदखेरकी आणि कळवंडे येथे हे प्रवेशाचे कार्यक्रम झाले. यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते. नारदखेरखी येथील कार्यक्रमात माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांच्यासह महिला आघाडी तालुकाप्रमुख अक्षता साळवी, रामपूर महिला आघाडीप्रमुख डॉ. वर्षा चव्हाण, माजी प.स . सदस्य अनुजा चव्हाण, अनिल साळवी, रामपूर सरपंच अमिता चव्हाण, शाखाप्रमुख व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर कळवंडे येथे कळवंडे गावचे उद्योजक वसंत उदेग यांच्यासह ग्रामस्थ व मालदोली गटातील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले, खरे तर वसंत उदेग यांनी याआधीच आपल्यासोबत यायला हवे होते. मात्र आता यापुढच्या काळात आपली कोणतीही विकास कामे थांबणार नाहीत. त्याची जबाबदारी आमच्यावर सोपवा. ज्यांच्यासोबत 10 ते 15 वर्षे काम केलेत, त्यांनी काही दिले नाही. येथील लोक शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात हा शेतीपूरक व्यवसायात असलेला आदर्श गाव आहे. याची आपल्याला कल्पना आहे. शेती व्यवसायातून उद्योजक बनता येते, हे वसंत उदेग यांनी जिल्ह्याला दाखवून दिले. आता शिवसेनेत आल्यामुळे ही कामे मार्गी लागलेली दिसतील, असा विश्वास ना. सामंत यांनी दिला. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक कपिल शिर्के, निहार कोवळे, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, तालुकाप्रमुख संदेश आयरे, रूपेश घाग, बाळकृष्ण जाधव, राकेश शिंदे, पुष्कर चव्हाण यांच्यासह कळवंडे, पाचाड, भोम, पोसरे, मालदोली, गांग्रई, केतकी, भिलेतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.