बाहेर पडताना स्वेटर, कानटोपी, मफलर घालावी
कोमट पाण्याचे सेवन करा, घशातील ओलावा टिकतो
लक्षणे आढळल्यास दवाखान्यात जा
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताजी फळे, पालेभाज्या, व्हिटॅमीन सी युक्त आहार घ्या
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
मागील काही दिवसांपासून दिवसा उन्ह, संध्याकाळी, पहाटे थंडी वाजत आहे. दिवसा वाराही सुटत आहे. सततच्या वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहे.
खासगीसह सिव्हीलची ओपीडीत रुग्णांची गर्दी वाढली आहे. वातावरणातील हे बदल आणखी काही दिवस राहणार असून आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. मकर संक्रातनंतर थंडी कमी होण्यास सुरुवात होते मात्र थंडी वाढतच आहे. दिवसा कधी ऊन तर कधी वाऱ्यासह थंडी, ढगाळ वातावरण होत आहे.
सकाळी धुके पडत आहे. पहाटे कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे सततच्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यासह साथीच्या आजारात वाढ झाली आहे. नागरिकांच्या डॉक्टरच्या फेऱ्या वाढत आहेत. २६ जानेवारीपर्यंत तापमानात बदल होणार आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. लहानमुले, वयोवृध्दांनी सर्दी, तापाचे लक्षणे असल्यास डॉक्टरांना दाखवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.