

खेड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त खेड येथे एक आगळावेगळा व भावनिक असा उपक्रम राबवण्यात आला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित भव्य एरो मॉडेलिंग शोच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास खेड तालुक्यातील विविध जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर साताऱ्याचे सदानंद काळे व त्यांचे चिरंजीव अथर्व काळे यांनी उपस्थितांना एरो मॉडेलिंगची माहिती देत तब्बल १२ मॉडेल विमानांची थरारक हवाई प्रात्यक्षिके सादर केली.
विशेष आकर्षण ठरले ते सर्वात मोठ्या मॉडेल विमानाने आकाशात झेप घेत २०० फूट उंचीवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा बॅनर फडकवत केलेली पुष्पवृष्टी. याक्षणी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला शिवचैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वैमानिक होण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, हा उदात्त हेतू ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमाला पं.स.चे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, न.प. मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगराध्यक्ष माधवी बुटाला,
उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, लायन्स क्लबचे प्रांतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, माजी नगराध्यक्ष विपिन पाटणे, नगरसेवक रहीम सहीबोले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल असलम दळवी यांचेही आभार मानण्यात आले.