देवरूख : झेरॉक्स सेंटर, शासकीय कार्यालय या ठिकाणी कागदाचा वापर होत असतो, याच प्रमाणात कागद वायादेखील जातो. मात्र या कचरा कागदाचा पुनर्वापर करून संगमेश्वर तालुक्यातील शेनवडे येथील शीतल बेटकर यांनी कागदापासून आकर्षक वस्तू बनवून याला मोठी किमती ओळख मिळवून दिली आहे.
उच्चभ्रू वर्गात हँडमेड लेटरपॅड, पत्रिका, फोल्डर्स, शोभेच्या वस्तू यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत. अशाच संधींचं सोनं करत आहे, शीतल बेटकर ही तरुणी. उच्च शिक्षणाबरोबरच ती रद्दी कागदाचा उत्कृष्ट वापर करून आकर्षक कलाकृती तयार करते. जुन्या कागदातून शोभेच्या वस्तू, विविध आकारांच्या भांड्या, फुलदाण्या, पेनहोल्डर, फाईल्स, फोल्डर्स अशा अनेक वस्तू शितलने बनवल्या असून तिच्या कामाला स्थानिक पातळीवर मोठी दादही मिळत आहे.
केवळ कागदच नव्हे, तर स्फटीक, अॅक्रेलिक पेण्ट्स, कपड्यांचे तुकडे, तुटलेले आरसे, स्प्रे पेंट्स, सिरॅमिक प्लेट्स यांसारख्या टाकाऊ वस्तूंचाही ती कौशल्याने पुनर्वापर करते. या कलाकृतींमुळे घराच्या सौंदर्यात भर पडतेच, त्याचबरोबर कचर्याची योग्य विल्हेवाटही लावते. आजच्या आधुनिक युगात हा उपक्रम एकप्रकारे ‘कचर्यातून किमती’कडे नेणारा मार्ग ठरत आहे. हातकागद आणि कागदी लगद्यापासून तयार होणार्या या वस्तू शिक्षणातही उपयोगी पडतात. विशेषतः भूमिती शिकताना लागणार्या आकृत्या, फोल्डर्स, भेटकार्डे, बांगड्यांच्या बॉक्सेस अशा वस्तू शीतल स्वतःच्या कल्पकतेने घडवत आहे.