

पावस : राजापूर तालुक्यातील हात दे व मिळंद गावांना जोडणारा जामदा नदीवरील लोखंडी पूल चार वर्षांपूर्वी मोठ्या महापुरामध्ये वाहून गेल्यामुळे परिसरातील लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी तातडीने त्याठिकाणी नव्याने साकव उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. तरी तातडीने या पुलासाठी निधी मंजूर करून व पूल उभारून लोकांची समस्या दूर करावी, अशी मागणी आमदार किरण सामंत यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राजापूर तालुक्यातील हात दे व मिळंद गावांना जोडण्यासाठी वीस वर्षांपूर्वी शासनाच्या साकव कार्यक्रमांतर्गत लोखंडी साकव बांधण्यात आला होता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारी अडचण दूर झाली होती. तसेच या साकवामुळे दोन्ही गावांतील नागरिक एकदम जवळ आले होते आणि दळणवळणाच्या द़ृष्टीने फारच सोयीस्कर झाले होते. मात्र, जुलै 2021 मध्ये जामदा नदीला आलेल्या महापुरामध्ये हा साकव वाहून गेल्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे तालुक्याचे आमदार राजन साळवी यांना या ठिकाणी लोखंडी साकव अथवा पादचारी पूल तयार करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते, परंतु त्याबाबत कोणती हालचाल न झाल्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिकांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या पावसाळ्यामध्ये या दोन्ही गावांचा संपर्क तुटत असल्यामुळे लोकांना ये-जा करणे फारच कठीण बनले होते. यामुळे वयोवृद्ध, आजारी माणसे, शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि पाचाल येथे मुख्य बाजारपेठ असून हातदे येथील नागरिकांना तेथे जाण्यास अडचण होत आहे. नागरिकांना सहा किलोमीटर वळसा मारून जावे लागत असून पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात आहे. तरी आपल्या माध्यमातून या ब्रीजसाठी निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.