रत्नागिरी : जिल्ह्यातील वाटद-खंडाळा येथे घडलेल्या 'तिहेरी खून' प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर एका धक्कादायक कटकारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. या तिन्ही खूनांचा ऐकमेकांशी संबंध असून मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने भक्ती मयेकर,सिताराम किर आणि राकेश जंगम तिघांचा अत्यंत थंड डोक्याने खून केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणात पोलिसांनी दुर्वास पाटील, विश्वास पवार, निलेश भिंगार्डे आणि सूशांत नरळकर या चार संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
दुर्वास पाटीलने त्याची प्रेयसी भक्ती मयेकर ही सतत लग्नासाठी तगादा लावत असल्याने तिचा 16 ऑगस्ट 2025 रोजी विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या दोघांच्या मदतीने आपल्याच सायली बारमधील वरच्या मजल्यावर वायरने गळा आवळून खून केला. नंतर तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला. दरम्यान, ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात खबर दिल्यावर पोलिसांनी तिचा शोध घेताना तिचे दुर्वासशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली आणि हा गुन्हा उघडकीस आला.
याप्रकरणात अधिक तपास करताना पोलिसांना सिताराम लक्ष्मण किर (वय 55, रा. कळझोंडी) हा भक्तीशी फोनवर अश्लिल बोलत असल्याच्या रागातून दुर्वासने विश्वास पवारच्या मदतीने त्याला 29 एप्रिल 2024 रोजी आपल्याच बारमध्ये बेदम मारहाण केली होती. ज्यात सितारामचा मृत्यू झाला.
दुर्वासच्या क्रूरतेची कहाणी इथेच थांबली नाही. सितारामच्या खुनाची माहिती पोलिसांना देईन अशी धमकी देणा-या राकेश जंगमचाही 'काटा काढण्याचा' निर्णय घेतला. ६ जून २०२४ रोजी दुर्वासने विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डेच्या मदतीने राकेशला कोल्हापूरला नेण्याच्या बहाण्याने त्याचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेहही आंबा घाटात फेकून दिला. अशा प्रकारे दुर्वासने आपल्या साथिदारांच्या मदतीने एकूण तीन खून केल्याची माहिती उघड झाल्याचेही पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राकेश जंगम बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली होती. परंतु त्याचा शोध घेण्यात जयगड पोलिसांना यश आले नाही. मात्र, एक वर्षानंतर राकेशचा खून झाल्याचे उघडकीस आल्यावर जयगड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी अपर पोलिस अधिक्षक बी.बी महामूनी हे अधिक तपास करत असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिक्षक नितीन बगाटेंनी सांगितले.
आपल्याकडे मिसिंग सेल स्थापन करण्यात आलेले असून मिसिंग केसेसचा शोध घेण्यात रत्नागिरी जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्हा पोलिसांनी यात उत्तम कामगिरी केलेली असून आतापर्यंत 98 टक्के मिसिंग केसेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.