

रत्नागिरी : लग्नासाठी तगादा लावणार्या गर्भवती प्रेयसीचा थंड डोक्याने खून करून तिचा मृतदेह आंब्याच्या घाटात फेकणार्या दुर्वास पाटील प्रकरणाला आता एक नवे, अधिकच थरारक वळण मिळाले आहे. भक्ती मयेकरच्या हत्येपुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून, आरोपी दुर्वास हा ‘सीरियल किलर’ असल्याचा धक्कादायक संशय पोलिसांना आहे. आपल्याच बारमधील दोन वेटरचेही त्याने खून केल्याच्या शक्यतेने पोलिस तपास करत असून, या घटनेने संपूर्ण रत्नागिरी हादरली आहे.
सुरुवातीला गुन्हा नाकारणार्या दुर्वासला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. गर्भवती प्रेयसी भक्ती मयेकर लग्नासाठी मागे लागल्याने तिचा अडसर दूर करण्यासाठी आरोपी दुर्वास पाटीलने तिला आपल्याच बारमध्ये बोलावून केबलने गळा आवळून खून केला. साथीदार सुशांत नरळकरच्या मदतीने तिचा मृतदेह गाडीतून आंब्याच्या घाटातील दरीत फेकून दिला, जो पोलिसांनी ट्रेकर्सच्या मदतीने बाहेर काढला. आता यामागे आणखी दोन हत्यांची शक्यता असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक आता या तिहेरी हत्याकांडाच्या दिशेने पुरावे गोळा करत असून, या क्रूरकर्मा दुर्वासच्या गुन्हेगारीचा खरा चेहरा लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे.