रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्या ठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक ठिकाणी नियोजित जल्लोष कार्यक्रम तसेच जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून असणारी ओळख लक्षात घेता अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातूनच नव्हे, तर देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत.
2025 ला निरोप देण्यासाठी आणि वर्ष 2026 च्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता रत्नागिरी पोलिस दलामार्फत अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली काही उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यामधील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्ये चालणाऱ्या जल्लोष कार्यक्रमांवर नजर ठेवण्याकरता विशेष गस्ती पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून दि. 31 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या दिवशी जल्लोष कार्यक्रम ठिकाणांवर व्हीडियोग्राफी पथकांव्दारे 24 तास नजर ठेवण्यात येणार आहे. महिलांची छेडछाड होणार नाही, याकडे महिला पथकांमार्फत विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील नववर्षाच्या स्वागताचे अश्लिल आणि आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलिस ठाण्याव्दारे करडी नजर ठेवण्यात येत आहे. नागरिक अधिक माहितीसाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. यावेळी रत्नागिरी पोलिस दलातर्फे सर्वांना असे आवाहन करण्यात येत आहे कि, नागरिकांनी कायद्याच्या बंथनांचे तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व पवित्र स्थळांचे जसे समुद्रकिनारे, गड-किल्ले व मंदिर यांचे पावित्र्य अबाधित राखण्याकरता दक्षता घ्यावी व सभ्यतेचे वर्तन ठेवून रत्नागिरी पोलिस दलास सहकार्य करावे.