रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने नाथजल नावाने हे बाटलीबंद पाण्याची विक्री राज्यातील सर्वच एसटी बसस्थानकावर केली जाते; मात्र एका लिटरच्या बाटलीवर 15 रुपये छापील किंमत असतानाही विक्रेत्यांडून सर्रास 20 रुपयेप्रमाणे विक्री सुरू आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सातारासह अन्य बसस्थानकांवर 5 रुपये जादा आकारणी करून पाण्याची विक्री सुरू आहे.
वर्षानुवर्षे असे सुरू असताना मात्र एसटी प्रशासनाच्यावतीने मात्र कारवाई होताना दिसत नाही. बाटलीबंद पाण्याच्या विक्रीतून एसटी महामंडळाच्या उत्पन्नाल आधार मिळण्याऐवजी याचा फायदा खासगी विक्रेत्यांनाच अधिक होत आहे. प्रवाशांना मात्र आर्थिक फटका बसत आहे.एसटी विभागाच्या वतीने नाथजल ही पाण्याची बाटली विक्री 2020 साली सुरू करण्यात आली. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा महान परंपरा आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला नाथ या नावाने संबोधले जाते.त्यांच्या आदराप्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास नाथजल हे नाव दिले आहे. मात्र याचा विसर विक्रेत्यांना पडला आहे. मागील पाच वर्षात काही ठिकाणी कारवाई झाल्यानंतर 15 रूपयास पाण्याची बाटली देण्यात आली. त्यानंतर पुन्हा जैसे थे झाले असून सर्वत्र 20 रूपयास पाण्याची बाटली विक्री होताना दिसून येत आहे.
रत्नागिरी-अक्कलकोट, तूळजापूर करणार्या प्रवाशांनी प्रवास केला असता रत्नागिरी, कोल्हापूर, मिरज, सांगली, सोलापूर, अक्कलकोट यासह विविधठिकाणी नाथजल पाण्याची बाटली 20 रूपयांनी विक्री होत असल्याचे विविध प्रवाशांनी सांगितले.पाण्याच्या बाटलीवर 15 रूपये किंमत आहे. मात्र खासगी एजंट, किरकोळ विक्रेत कुलींगच्या नावाखाली 15 रुपयांची बाटली तब्बल 20 रूपयास विक्री करीत आहेत.राज्याच्या सर्वच आगारात असा सर्रास प्रकार सुरू असल्यामुळे 5 रूपये जादा आकारणीमुळे लाखो, करोडोंची उलाढाल या खासगी एजंटची होत आहे. त्यामुळे एसटी विभागाने याकडे लक्ष देवून योग्य तपासणी मोहीम करून संबंधितावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी असा प्रवास असतो. मात्र सर्वच बसस्थानकावर 15 ऐवजी 20 रूपयास बाटली विक्री होते. प्रवाशांची सरळ सरळ लूटच सुरू आहे. नाथजल या बाटलीवर पाण्याच्या बाटलीची किंमत 15 रूपये तरीही 5 रूपये अधिकची आकारणी करून विक्री सुरू आहे. ही लूट थांबवणे गरजेचे आहे, असे मत प्रवासी सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.
नाथजल पाण्याची बाटली 15 रुपयास आहे. कोणी 20 रुपयास विकत असतील, तर प्रवाशांनी आगारात लेखी तक्रार करावी, त्यानुसार कारवाई केली जाईल. तक्रार आल्यानंतर आम्ही कारवाई करू.बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी