Turtle Conservation 
रत्नागिरी

Ratnagiri Sea Turtle Conservation | कासवांच्या प्रजननासाठी आता वन विभागाचा 'वॉच'; रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवरील बांधकामांना चाप!

Ratnagiri Sea Turtle Conservation | जिल्ह्यातील किनाऱ्यांवर होत असलेल्या अनियोजित धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांमुळे सागरी कासवांच्या प्रजननात अडथळे निर्माण होत असून, याची गंभीर दखल महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतली आहे.

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील किनाऱ्यांवर होत असलेल्या अनियोजित धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांमुळे सागरी कासवांच्या प्रजननात अडथळे निर्माण होत असून, याची गंभीर दखल महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतली आहे. यापुढे किनाऱ्यांवर कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये, नेवरे आणि आडे यांसारख्या महत्त्वाच्या किनाऱ्यांवर संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत. मात्र, या बांधकामासाठी वापरण्यात येणारे मोठे खडक आणि अनियोजित स्वरूपामुळे सागरी कासवांना अंडी घालण्यासाठी वाळूत जागा मिळत नव्हती. त्यातच बंधाऱ्याच्या कामामुळे जेसीबी, डंपर यांची ये-जा सुरू राहिल्यामुळे निर्माण होणाऱ्या कंपनामुळे अनेक कासवे अंडी न घालताच समुद्रात परत जात असल्याचे समोर आल्यानंतर कांदळवन कक्षाने तज्ज्ञांची एक समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली.

या समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बंधाऱ्यांच्या कामामुळे कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचा अहवाल सादर केला. या अहवालानंतर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. आडे किनाऱ्यावरील बांधकाम थांबवून तिथले अडथळा ठरणारे खडक हटवण्यात आले, ज्यानंतर कासवांनी पुन्हा तिथे अंडी घालण्यास सुरुवात केली.

या पार्श्वभूमीवर, कांदळवन कक्षाने प्राधिकरणाला पत्र लिहून किनाऱ्यांवरील अशा कामांसाठी वन विभागाची परवानगी अनिवार्य करण्याची सूचना केली होती. या सूचनेची अंमलबजावणी करत प्राधिकरणाने आपल्या १९४ व्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

यानुसार, गणपतीपुळे, माखजन खाडी, राजीवाडा आणि भाट्ये यांसारख्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यासाठी आता कांदळवन कक्षाची संमती मिळवणे आवश्यक आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात परवानगी मागितली असून, कांदळवन कक्षाने त्यांच्याकडे प्रस्तावित भिंतींचा आकार, स्थान आणि बांधकामाचे स्वरूप याबद्दल सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामामुळे जेसीबी, डंपर व अन्य यंत्रणांचे व्हायब्रेशनमुळे कासवे किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यंदा भाट्ये किनाऱ्यावर दोनच घरट्यांचे संवर्धन करता आले आहे.
- समीर भाटकर, कासवमित्र, भाट्ये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT