Rajapur mid day meal fraud
राजापूर: शालेय विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहारातील तांदळाच्या दहा पोत्यांवर डल्ला मारण्याचा झालेला प्रयत्न जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडल्याची घटना नाटे येथे बुधवारी (दि.५) मध्यरात्री घडली. पकडण्यात आलेल्या गाडीमध्ये शालेय पोषण आहारातील 50 किलो वजनाची 10 पोती आढळून आली.
अखेर प्रकरण नाटे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्या शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक आणि दोन ग्रामस्थ अशा संशयित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघड होताच स्थानिक ग्रामस्थांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सुमारे ९.३० वाजता नाटेश्वर मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेचा उत्सव सुरू असताना मकरंद मधुसुदन धाक्रस (वय ३७, रा. नाटे भराडीन) हे मंदिरात उपस्थित होते. त्याचदरम्यान रात्री १.२४ वाजता मनोज आडविरकर यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, नाटेनगर विद्यामंदिर येथे मुलांच्या पोषण आहाराकरिता आलेला तांदूळ चोरून नेताना गावकऱ्यांनी एक गाडी पकडली आहे.
त्यानंतर धाक्रस यांनी शाळेचे शिपाई रविकांत भगवान धामापुरकर यांना फोन करून शाळेत पाठविले. त्यावेळी शाळेच्या पटांगणात उभ्या असलेल्या गाडीची (MH-08-AP-6927) झडती घेतली असता ५० किलो वजनाची एकूण १० पोती पोषण आहाराची भरलेली आढळून आली. त्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार पुढे आला.
पकडण्यात आलेली गाडी ही कुणाल अनिल थळेश्री (रा. नाटे बांदचावाडी) याची असून त्याच्यासोबत सुनिल वसंत डुगीलकर (रा. नाटे बांदकरवाडी) हेही उपस्थित होते. पकडण्यात आलेल्या वाहनामध्ये सापडलेले तांदूळ हे विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकरिता आलेले होते. सदर तांदळाची किंमत अंदाजे ७,५०० असून, गाडीची किंमत ३ लाख अशी मिळून सुमारे ३,०७, ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
दरम्यान, मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून सागरी पोलीस ठाणे, नाटे यांनी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र तानू जाधव, सहाय्यक शिक्षक नाना बिरा करे, कुणाल अनिल थळेश्री, सुनील वसंत डुगीलकर अशा चार संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहायक पोलीस फौजदार यु. सी. पिलनकर करत आहेत.