

तासगाव : राजापूर (ता. तासगाव) येथील प्रेमीयुगुलाने तासगाव येथे कौटुंबिक वादातून जीवन संपविले. ही घटना गुरुवार, दि. 21 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निदर्शनास आली. सतीश महालिंग देशमाने (वय 30, मूळ रा. राजापूर) व अनिता रमेश काटकर (35, मूळ रा. राजापूर) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात सुरू होते.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, सतीश हा विवाहित होता. त्याला दोन मुले आहेत, तर अनिता हिला एक मुलगा व एक मुलगी असून, तिच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर अनिता आणि सतीश यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. या प्रकरणाची चर्चा गावात सुरू झाल्याने सतीशच्या कुटुंबात वारंवार वाद, भांडणे होऊ लागली. शिवाय याच कारणावरून अनितासुद्धा ‘माझे काय होणार?’ असे म्हणून सतीशबरोबर वाद घालत होती. प्रकरण टोकाला गेल्याने दीड वर्षापूर्वी सतीश व अनिता गाव सोडून तासगाव येथील दत्त माळ, सरस्वतीनगर येथे राहायला आले. अनिताची मुले तिच्यासोबत होती. दरम्यान, सतीश याने अनिताशी दुसरा विवाह केला असल्याची चर्चा आहे. दोघेही भाड्याची खोली घेऊन अनिताच्या मुलांसह राहत होते. सतीश हा अधून-मधून राजापूर येथे पत्नी व मुलांना भेटायला जात असे.
अनिता व सतीश हे एकत्र राहत असल्याने सतीशचा नातेवाईकांशी नेहमी वाद होत होता. त्यातून अनिताही सतीश याला ‘तुझे नातेवाईक फार त्रास देतात. यापुढे आपले काय होणार?’ असे म्हणून वाद घालत होती. दोघांतील वाद वाढतच चालला होता, अशी चर्चा घटनास्थळी होती. गुरुवारी दुपारी दोघांनी वासुंबे येथे भाड्याच्या खोलीत विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम तासगाव पोलिस ठाण्यात सुरू होते. अधिक तपास सुरू असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.