रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा खडक मोहल्ला येथील नव्याने सुरु होणाऱ्या मोबाईल शॉपीत फर्निचरचे काम सुरु होते. यावेळी कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका कामगाराचा धारदार हत्याराने छातीत वार करून खून करण्यात आला. या घटनेत जखमी कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरकर वाड्यातील नव्याने सुरु होणाऱ्या मोबाईल शॉपीत फर्निचरचे काम सुरु होते काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. वादाचा स्वरूप इतका तीव्र झाला की, एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर धारदार हत्याराने हल्ला केला. छातीत गंभीर जखम झाल्याने पीडित कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर फरार झालेल्या दोन संशयितांना पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मिरकर वाडा परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, लवकरच गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.