

लांजा: पुढारी वृत्तसेवा : लांजा तालुक्यातील कोंडये रांबाडेवाडी येथून बेपत्ता झालेल्या वैशाली चंद्रकांत रांबाडे या बेपत्ता महिलेचा खून झाल्याचे अखेर पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले आहे. कोंडये येथीलच राजेंद्र गोविंद गुरव याने तिचा २९ जुलैरोजी दुपारी कुवे येथील जंगलात खून केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. (Ratnagiri Murder Case)
दरम्यान, आरोपी राजेंद्र गुरव आणि मृत वैशाली रांबाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. वैशाली हिने वारंवार पैशाचा तगादा लावला होता, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंडये रांबाडेवाडी येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे (वय ४८) ही दि. २९ जुलै २०२३ रोजी आपण कुवे येथे डॉक्टरकडे जातो, असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, ती घरी न परतल्याने मुंबईहून पती चंद्रकांत रांबाडे हे गावी आल्यानंतर त्यांनी ३० जुलैरोजी लांजा पोलीस ठाण्यात वैशाली रांबाडे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर लांजा पोलिसांनी शोध सुरू केला होता. (Ratnagiri Murder Case)
दरम्यान, पती चंद्रकांत रांबाडे यांनी दि.११ ऑक्टोबररोजी वैशाली रांबाडे हिला राजेंद्र गोविंद गुरव यांनीच फूस लावून पळून नेल्याची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र गुरव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी (दि.१२) त्याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. याप्रकरणी लांजा पोलीस तपास करत असताना या घटनेत आरोपी राजेंद्र गुरव याने आपणच वैशाली रांबाडेचा खून केल्याची तपासात कबुली दिली. कुवे येथील जंगल भागात आपण तिचा खून केल्याची त्याने सांगितले.
त्यानंतर आज (दि.१३) उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे व लांजा पोलिसांनी कुवे येथील जंगलात जाऊन पाहणी केली. येथे वैशाली रांबाडेच्या मृतदेहाचे अवशेष व काही वस्तू आढळून आल्या. त्यानंतर नातेवाईकांनी वैशाली रांबाडे हिच्या मृतदेहाची ओळख पटवली.
राजेंद्र गुरव २९ जुलैरोजी वैशालीला कुवे येथील जंगलात घेऊन गेला होता. यानंतर त्याने प्रथम तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्या पाठीमागे डोक्यात लाकडाने प्रहार करून आणि गळा दाबून खून केला.
या प्रकरणी राजेंद्र गुरव यांच्यावर विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, अरविंद कांबळे, भालचंद्र रेवणे, राजेंद्र कांबळे, जितेंद्र कदम, अमोल दळवी, सुनील माने, दिनेश आखाडे, प्रियांका कांबळे, नितेश राणे, सुयोग वाडकर, सुजाता महाडिक, बापूराव काटे, चेतन घडशी, संजय जाधव यांनी तपास केला.
हेही वाचा