देवरुख : 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' आणि 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या आणि "आम्ही प्रवाशांच्या सेवेला नवीन टकाटक गाड्या आणल्या आहेत," असा गाजावाजा करणाऱ्या एसटी महामंडळाचा आणखी एक जीवघेणा आणि भोंगळ कारभार रविवारी रात्री संगमेश्वर स्थानकातमध्ये चव्हाट्यावर आला आहे. एका बसच्या बॅटरीचा स्पोर्ट झाला, अन प्रवाशांची धांदल उडाली.
देवरुख आगाराच्या एका लांब पल्ल्याच्या बसच्या बॅटरीचा संगमेश्वर आगारातच रात्री साडेआठच्या सुमारास प्रचंड मोठा, कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या आवाजाने संपूर्ण आगार हादरून गेले आणि प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली . महामंडळाच्या या निकृष्ट दर्जाच्या देखभालीमुळे आणि संगमेश्वर स्थानकातील तांत्रिक व्यवस्थेच्या दिवाळखोरीमुळे प्रवाशांना फटका बसत आहे.
रविवारी रात्री संगमेश्वर आगार परिसर प्रवाशांनी खचाखच भरलेला होता. देवरुख आगाराची एम.एच. १४ एल.एक्स. ७१४२ ही 'देवडे ते बोरिवली' जाणारी गाडी आगारात उभी होती. अचानक या गाडीतून प्रचंड मोठा आवाज झाला. आवाज इतका भयानक होता की, भयभीत झालेले प्रवासी एसटी बस मधून भयभीत होऊन बाहेर पडू लागले. तर आजूबाजूचे लोक व आगारात बसलेले प्रवासी आवाजाच्या दिशेने धावू लागले. या वेळी बसच्या बॅटरी कक्षातून प्रचंड धूर आणि रासायनिक पाणी बाहेर फेकले जात असल्याचे दिसून आले.
सुदेवाने हा प्रकार गाडी आगारात उभी असताना घडला.तर पुढचे तर्क वितर्क यावेळी उपस्थिता कडून लढवळे जात होते. आणि तसे तशी काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असती का? असा संतप्त आणि आक्रमक सवाल आता जनता विचारत आहे.
हा स्फोट झाला तेव्हा बसचे चालक आणि वाहक नियंत्रण कक्षात नोंद करण्यासाठी गेले होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवाची पर्वा न करता तात्काळ बॅटरीचा कक्ष उघडला आणि मुख्य सप्लाय कीट बाहेर काढला, ज्यामुळे पुढील भीषण संभाव्य घटना टळली. स्फोट इतका तीव्र होता की बॅटरीच्या भागाचे तुकडे झाले.
प्रवाशांच्या सेवेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून आणलेल्या या गाड्या बाहेरून एकदम नवीन आणि 'टकाटक' दिसतात. मग अशा नव्या कोऱ्या गाडीची बॅटरी फुटतेच कशी? महामंडळात निकृष्ट दर्जाचे सुटे भाग वापरून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे का? की 'बहुजन सुखाय' म्हणत प्रवाशांना मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा हा डाव आहे? असा थेट आरोप प्रवाशांनी केला आहे.
संगमेश्वर हे भौगोलिकदृष्ट्या मुंबई-गोवा महामार्गावरील अगदी मध्यवर्ती आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. कोकणात ये-जा करणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा लांब पल्ल्यावर धावणाऱ्या शेकडो एसटी बसेस दररोज या स्थानकात थांबून पुढे मार्गस्थ होतात. शासनाने या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून सुसज्ज आणि भव्य बस स्थानक इमारत तर उभारली आहे, मात्र गाड्यांची तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी येथे हक्काचा 'एकही कायमस्वरूपी मेकॅनिक उपलब्ध ठेवलेला नाही. ही संगमेश्वरची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
सध्याची परिस्थिती अशी आहे की, संगमेश्वर स्थानकात किंवा महामार्गावर जवळपास एखाद्या गाडीत बिघाड झाला, तर चालक- वाहकाला देवरुख आगाराशी संपर्क साधावा लागतो. तिथे माहिती मिळाल्या नंतर देवरुखवरून मेकॅनिक आणि साहित्य संगमेश्वरला पाठवले जाते. देवरुख ते संगमेश्वर हे अंतर पार करून मेकॅनिक पोहोचेपर्यंत १ ते २ तास सहज निघून जातात.
रात्रीच्या बॅटरी स्फोटा नंतरही हाच प्रकार घडला. देवरुख आगाराला चालक- वाहकाने माहिती दिल्यानंतर तिथून दुसरी बॅटरी आणि मेकॅनिक येईपर्यंत तास ते दीड तास प्रवाशांना रात्रीच्या वेळी ताटकळत राहावे लागले. रात्रीच्या वेळी लहान मुले, वृद्ध आणि महिला प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. बिघाड एका गाडीत होतो, पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मनस्ताप शेकडो प्रवाशांना सहन करावा लागतो.
संगमेश्वर हे मध्यवर्ती स्थानक असल्याने आगार आवारात २४ तास कायमस्वरूपी मेकॅनिक आणि आवश्यक तांत्रिक साहित्याची उपलब्धता असावी, अशी रास्त मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी वर्ग आणि जनतेकडून गेली अनेक वर्षे सातत्याने केली जात आहे. परंतु, कुंभकर्णी झोपेत असलेल्या एसटी प्रशासनाकडून या मागणीकडे नेहमीच अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. सुसज्ज इमारत उभी करून प्रवाशांना आकर्षित करायचे, पण गाड्यांच्या देखभालीच्या आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्यांना वाऱ्यावर सोडायचे, हा महामंडळाचा कोणता कारभार?
एसटी महामंडळाने आतातरी या गंभीर समस्येकडे डोळे उघडून पाहावे आणि संगमेश्वर स्थानकात तातडीने कायमस्वरूपी मेकॅनिकची नियुक्ती करावी, अन्यथा प्रवाशांच्या या रोषाचा मोठा उद्रेक महामंडळाला सहन करावा लागेल, असा आक्रमक इशारा येथील जनतेने दिला आहे.