खेड : शुक्रवार, दि. 2 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकात रो-रो (रोड ट्रेन) सेवा दोन तासांहून अधिक काळ रखडल्याची घटना घडली. कोलाड येथून मडगावकडे मालवाहू ट्रक घेऊन जाणारी रो-रो मालगाडी खेड स्थानकात दाखल झाल्यानंतर थांबवण्यात आली. रो-रो ट्रेनमधील एका मालवाहू ट्रकवरील लोड एका बाजूला सरकल्याचे निदर्शनास आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही ट्रेन तत्काळ थांबवण्यात आली. ट्रक कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखत तत्काळ सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या.
घटनास्थळी ट्रकमधील माल पुन्हा व्यवस्थित ठेवण्याचे काम सुरू असून, सेफ्टी बेल्ट लावून ट्रक सुरक्षित करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी किंवा इतर रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्व सुरक्षा उपाय पूर्ण झाल्यानंतर आणि मालवाहू ट्रक पूर्णपणे सुरक्षित केल्यानंतर रो-रो ट्रेन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रसंगात मोठी दुर्घटना टळल्याने प्रवासी आणि स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.