रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी शहराचे पाणी संकट काही प्रमाणात कमी व्हावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. पाणी पुरवठा समिती सभापती निमेश नायर यांच्याकडून कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत याबाबतची माहिती घेऊन त्या कामांसाठी पालकमंत्री निधी उपलब्ध करून देणार आहेत.
यापूर्वी नळपाणी योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने शीळ धरणाच्या ठिकाणी केलेल्या कामांचे बिल अदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याच्या पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. त्यानुसार सुमारे ७५ लाख रुपयांचे बिल अदा करण्यास प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे.
यांदा पर्जन्यमान फारच कमी झाले. शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भिले गेले तरी पाऊस पडण्याचे दिवस कमी झाले. जिल्ह्यात सरासरी ११२ दिवस पाऊस पडतो. परंतु यंदा केवळ ८४ ते ८५ दिवसच पाऊस पडला.
त्याचबरोबर कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. त्यामुळे पाणी बचतीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने आठवड्यातून किमान दोन दिवस तरी पाणी पुरवठा बंद ठेवणे अपेक्षित असल्याचा सल्ला नगर परिषदेला दिला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणामध्ये पाणीसाठा असला तरी धरणाकडून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे. शीळ धरण येथे केलेल्या कामाचे सुमारे १ ते दीड लाख रुपयांचे बिल मिळाले नसल्याने ठेकेदार कंपनीला आर्थिक अडचण आल्याने पानवल धरणाकडून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंतची जलवाहिनी अंथरण्याचे काम रखडले होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेने सर्वानुमते मंजुरी देऊन त्या कामाचे पैसे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्याचा ठराव केला.
प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार ही प्रशासकीय मान्यता मिळाी असून ठेकेदार कंपनीला पैसे मिळाल्यानंतर पानवल धरणाकडून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत तेराशे मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होणार आहे.
पानवल धरणाचे पाणी किमान दोन महिने तरी पुरू शकते. याचबरोबर इतर काही उपाययोजना करणे अपेक्षित आहे, यामध्ये नाचणे तलावातील गाळ उपसा करून हे पाणी नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी जलवाहिनी टाकावी लागेल. त्याचबरोबर शीळ धरनावरील जी जुनी जॅकवेल पडून विहीर बुजली गेली आहे ती साफ करावी लागेल.
त्यानंतर ही विहीर बांधून घेणे आवश्यक असल्याचे सभापती नायर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. पानवल धरणाचे पाणी सुरू झाल्यानंतर नाचणे आणि शीळ धरनावरील जुनी विहीर कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याचे संकट बहुतांश कमी होईल, अशी आशा आहे.