Uday Samant| रत्नागिरी अस्वच्छ ठेवणाऱ्यांवर पोलिस कारवाईचा इशारा!

भाजी मंडईच्या नूतन इमारतीचे लोकार्पण; सफाईत गडबड झाल्यास माझा पेन चालेल : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : नूतन इमारत लोकार्पणसमयी मार्गदर्शन करताना पालकमंत्री सामंत. सोबत इतर मान्यवर.
रत्नागिरी : नूतन इमारत लोकार्पणसमयी मार्गदर्शन करताना पालकमंत्री सामंत. सोबत इतर मान्यवर.
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात विकासकामे होत असताना अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा. स्वच्छतेच्या कामात गडबड झाली तर माझा पेन चालेल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हात जोडून विनंती करतानाच, कचरा उचलण्यासाठी आवश्यक तेवढ्या गाड्या उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. रत्नागिरीच्या जुन्या बाजारपेठेतील भाजी मंडईच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत ११ गाळ्यांसह सुसज्ज सभागृहाची सुविधा आहे. या मंडईला ठराव करून ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव द्यावे, अशी सूचनाही सामंत यांनी केली.

स्वामी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने देखणी इमारत उभारल्याबद्दल त्यांनी गौरवोद्‌गार काढले. स्वच्छतेत तडजोड नको, रत्नागिरी शहराचा मोठ्या शहरांच्या धर्तीवर विकास होत आहे. नगरपरिषदेची नूतन प्रशासकीय इमारत, विमानतळासह विविध विकासकामे मार्गी लागत असताना शहरातील अस्वच्छता शोभणारी नाही, असे सामंत म्हणाले.

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना पूर्ण मोकळीक द्यावी. त्यांना योग्य मानधन आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी नगरपरिषद पार पाडू शकत नसेल, तर ही कारवाई पोलिसांकडे सोपवण्याची वेळ आणू नये, असे सांगत त्यांनी प्रशासनाला स्वच्छतेबाबत कठोर भूमिका घेण्यास बजावले.

अग्निशमन यंत्रणेला दहा मिनिटांची मर्यादा रत्नागिरी नगरपरिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने समन्वयाने काम करावे. आपत्तीचा फोन आल्यानंतर दहा मिनिटांत अग्निशमन दलाची मदत घटनास्थळी पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नवीन भाजी मंडईसह शहरातील सुविधांचे जतन करण्याचे आवाहन केले. सभापती विजय खेडेकर यांनी इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले.

नगरसेविका सायली पाटील यांनी नवलाई तलावाच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. बाजारपेठेतील व्यावसायिक किशोर मोरे यांनी जुन्या भाजी मार्केटचा इतिहास सांगितला. यावेळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक, सभापती तसेच शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विकासकामे पूर्ण करा, विजयाची खात्री बाळगा!

नगरसेवकांनी समन्वयाने विकासकामांची जबाबदारी वाटून घेऊन ती पूर्णत्वास न्यावीत. अशा पद्धतीने कामे केली की निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतानाच विजयाची खात्री वाटली पाहिजे, असा सल्ला पालकमंत्री सामंत यांनी नगरसेवकांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news