दाट लोकवस्तीचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेतच 
रत्नागिरी

Ratnagiri News : दाट लोकवस्तीचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेतच

खेड न. प. निवडणूक प्रभाग क्र. ५

पुढारी वृत्तसेवा

अनुज जोशी

खेड : खेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ५ मध्ये एकूण १,५३१ लोकसंख्या असून त्यापैकी अ.जा. ५०० व अ.ज. २२ नागरिक आहेत. उत्तरेस प्रभाग क्र. १, पूर्वेस प्रभाग क्र. ४, दक्षिणेस प्रभाग क्र. ८, तर पश्चिमेस प्रभाग क्र. ६ व ७ अशा हद्दीने हा प्रभाग वेढलेला आहे. हा प्रभाग दाट लोकवस्तीचा असून येथे मागासवर्गीय समाजाचे प्रमाण मोठे आहे. मात्र या नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट दिसते. एल.पी. स्कूल, तटकरी हॉल परिसर, भैरी भवानी नगरचा काही भाग, संत रोहिदास नगर, महात्मा फुले नगर, एल.टी.टी. स्कूल परिसर तसेच नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र ही या प्रभागातील प्रमुख स्थळे आहेत.

समस्या अधिक, उपाय नाहीत

तुटलेले जोडरस्ते, अर्धवट व तुटलेली गटारे, तसेच पावसाळ्यात चिखल व पाणथळ भाग या समस्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. नगरपरिषदेच्या कर्मचारी वसाहतीची दुरवस्था ही आणखी एक गंभीर बाब आहे. सार्वजनिक संपत्ती असतानादेखील तिचे जतन व देखभाल शून्य आहे.

वारसा असलेला परिसर; पण दुर्लक्षित

या प्रभागात डोंगर भागातील प्राचीन लेणी तसेच गरम पाण्याचे उन्हवरे हे वारसास्थळ आहे. ही ठिकाणे धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असूनही गेल्या दोन दशकांत त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पर्यटनासाठी या स्थळांचा विकास व्हायला हवा होता, पण आजही तेथपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता वा सुविधा नाहीत. स्थानिक श्रद्धास्थळे असलेले हे परिसर आज दुर्दशेचे प्रतीक बनले आहेत.

अव्यवस्थेचा अड्डा बनलेला भाग

रस्त्याच्या कडेला दिसणारी थोडी मोकळी जागा असली की, तिथे अनधिकृत दुकान खोके उभारले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, कचऱ्याचा प्रश्न, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. प्रभागाच्या विकासाचे आश्वासन देणाऱ्यांकडून प्रत्यक्ष कृती मात्र अद्याप झालेली नाही.

नागरिकांच्या अपेक्षा

या प्रभागातील नागरिक आता केवळ आश्वासनांवर नाही, तर ठोस कामांवर विश्वास ठेवू इच्छितात. नागरिक म्हणतात, 'आम्हाला रस्ते, गटारे, स्वच्छता आणि पर्यटन विकास हवा, फक्त भाषणं नाही.' नगरपरिषदेचा निधी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष जर या भागाकडे वळले, तर हा प्रभाग धार्मिक पर्यटनासोबत आधुनिक नागरी सुविधांनी युक्त 'आदर्श प्रभाग' ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT