रत्नागिरी : प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर (26,रा.मिरजोळे नाखरेकरवाडी,रत्नागिरी) तरुणीचा तिच्या खंडाळामधील प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, संशयित प्रियकराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. भक्ती मयेकर आणि खंडाळामधील एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. परंतू काही दिवसांपूर्वी त्या तरुणाचे लग्न ठरल्याचे आणि त्याचे होणार्या पत्नीसोबतचे फोटो पाहिल्यानंतर या दोघांमध्ये बिनसल्याने वाद सुरू झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, याच वादातून संशयित प्रियकराने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्यांनी आंबा घाटाकडे प्रवास केला असावा त्याठिकाणी त्यांच्या पुन्हा वाद होउन प्रियकराने रागाच्या भरात तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
ही तरुणी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा.पासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्व ठिकाणी तिचा शोध घेउन 21 ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना तरुणी आणि तिचा खंडाळा येथील प्रियकर यांच्यातील संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने संशयित तरुणाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. त्यानुसार, शनिवारी दुपारी स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ आंबा घाटाकडे धाव घेतली आहे. तेथे मृतदेहाचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असून राजू काकडे हेल्प अॅकॅडमी स्वयंसेवकांच्या मदतीने त्या तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
टॅटू मुळे पटली ओळख
शनिवारी पोलिस आणि कुटुंबीयांनी आंबा घाटात शोध घेतला असता दरीत भक्तीचा मृतदेह सापडला. चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते; मात्र तिच्या हातावरील टॅटूमुळे ओळख निश्चित करण्यात आली.