

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील खडपोली नदीवरील पूल कोसळल्यामुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीकडे जाणारे दळणवळण ठप्प झाले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच, खडपोली औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांना उत्पादन बंद ठेवण्याची वेळ आल्यामुळे शेकडो कामगार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट)? ? तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाब विचारला असून तत्काळ पर्यायी दळणवळण मार्ग अवजड वाहनांसाठी खुला करण्याची आग्रही मागणी केली आहे. अडरेकर यांनी सांगितले की, पूल कोसळणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे थेट परिणाम आहे. जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व अधिकार्यांनी तातडीने पूल पुनर्बांधणीसाठी कार्यवाही सुरू करावी. तोपर्यंत अवजड वाहतुकीसाठी (ट्रेलर, कंटेनर, टँकर इ.) सक्षम पर्यायी पूल किंवा मार्ग उपलब्ध करून द्यावा. अन्यथा कारखानदार व कामगारांवर येणार्या संकटाला प्रशासनच जबाबदार राहील.
सध्या पेढांबे ब्रिज मार्गे किंवा कळंबस्ते-दळवटणे-मोरवणे-वालोटी-खडपोली/ आकले या दुय्यम मार्गाने लहान वाहने चालू ठेवण्यात आली असली तरी अवजड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी उद्योगांचे उत्पादन थांबले असून, कामगारांचे उपजीविकेवर गदा आली आहे. कामगारांवर बेरोजगारीची वेळ येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने विशेष यंत्रणा स्थापन करावी, अन्यथा, न्याय मिळवण्यासाठी जनतेसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू, असा इशाराही मुराद अडरेकर यांनी दिला आहे.