Ratnagiri Court Bail
रत्नागिरी : रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पाण-भूयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (वय 25, सध्या रा.पिंपळगाव, नाशिक, मुळ रा. एलनाबाद, जि. सिरसा हरीयाणा) या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणातील संशयित प्रियकर जसमिक केहर सिंगचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी (दि.१) मंजूर केला. त्याने 5 जुलैरोजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
त्याच्या विरोधात बेपत्ता तरुणीचे वडील प्रकाशसिंग हरनेकसिंग धाडियाल (वय 69, रा. एलनाबाद, जि. सिरसा हरियाणा) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी 3 जुलैरोजी तक्रार दिली होती. त्यानुसार, फिर्यादीची मुलगी सुखप्रित सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. आपल्या मुलीच्या घातपातास तिचा प्रियकरच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यांची मुलगी सुखप्रित हिचा मित्र जसमिक केहर सिंग याने तिच्याशी मैत्री करन तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिच्याशी असलेले नाते तोडले होते.
तसेच दुस-या मुलीसोबत रिलेशनशिप सुरु केले होते. त्याने तिला वेळोवेळी टाळून तिचा मानसिक छळ केला होता. ती रविवार 29 जून जस्मिकला भेटण्यासाठी रत्नागिरी येथे आलेली असताना त्याने तिला न भेटताच तू परत नाशिकला जा असे सांगितले. त्यामुळे तिला मानसिक त्रास देवून फिर्यादी यांची मलगी सुखप्रित धाडीवाल हिला रत्नागिरी येथून समुद्राच्या पाण्यात उडी मारुन जीव देण्यासाठी प्रवृत्त केले. असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारीवरुन शहर पोलिसांनी संशयित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आपल्याला अटक या भितीने संशयित प्रियकर जस्मिकने 5 जुलै रोजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
त्यावर संशयिताचे वकिल अॅड.सचिन पारकर यांनी असा युक्तिवाद केला की सुखप्रितने नाशिकलाच सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये कोणाचेही नाव नाही. तिच्या आत्महत्येस ती स्वतःजबाबदार आहे. सुखप्रितने 27 जून पासूनच आपला मोबाईल बंद ठेवून नंतर तो रत्नागिरीत सुरु केला. त्या कालावधीत ती कुठे होती याची माहिती जसमिकला नव्हती. तसेच जसमिकने तिला कधीही कॉल केलेला नाही.तसेच रत्नागिरीला बोलावलेले नाही. तसेच तिचा आतापर्यंत कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली किंवा नाही याबाबात कोणताही पुरावा मिळालेला नाही. अॅड. सचिन पारकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने जसमिकचा 50 हजारांचा अटकपूर्व जामीन अर्ज मान्य केला.