

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने नव्या वर्षात एसटीची भाडेवाढ करण्यात आली होती. या भाडेवाढमुळे रत्नागिरी आगारासह जिल्ह्यातील विविध आगारांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. दररोज दीड ते दोन लाखांची उत्पन्नात भर पडत आहे. एकंदरीत, चार महिन्यांत तब्बल दीड ते 2 कोटींचे उत्पन्न रत्नागिरी आगाराला मिळाले आहे. एकीकडे जिल्ह्यातील दुसर्या आगाराला भाडेवाढीमुळे फटका बसला. मात्र, रत्नागिरी आगाराला उलट उत्पन्नात भर पडल्याचे सांगण्यात आले.
राज्याच्या शहरासह ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे. मात्र, मागील कित्येक वर्षापासून एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे तसेच डिझेल, चेसीस, टायर यासह इतर कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने सर्व प्रकारच्या सेवामध्ये 25 जानेवारी 2025 पासून तब्बल 14.95 टक्के इतकी भाडेवाढ केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. राज्यासह विविध जिल्हाभरात सर्वसामान्य प्रवासी तसेच विविध संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. काही ठिकाणी निर्णयाविरोधात आंदोलनेही झाली. तरीही महामंडळाने भाडेवाढ मागे न घेता सुरूच ठेवली. तिकिटात दरवाढ करून तब्बल चार महिने पूर्ण झाले आहेत. यामुळे रत्नागिरी आगार मालामाल झाले असून दीड कोटींचे उत्पन्न वाढले असल्याचे सांगण्यात आले. पूर्वी दिवसाला 9 लाखांचे उत्पन्न मिळत होते; मात्र आता 10 ते 11 लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
जवळचा प्रवास केल्यास 10 ते 25 रुपयांचा, तर लांब पल्ल्याच्या गाडीचा प्रवास केल्यास 100 ते 150 रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. एकंदरीत, भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये जरी नाराजी असली तरी रत्नागिरी एसटी बस आगार मात्र मालामाल झाले आहे. एसटी महामंडळाच्या वतीने विविध कारणांसाठी एसटी तिकिटाच्या दरात वाढ केल्यामुळे रत्नागिरीसह 8 आगारांना फायदाचा झाला. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. त्याची जागा खासगी ट्रॅव्हल्सने घेतली आहे.