समीर जाधव
चिपळूण : तब्बल नऊ वर्षांनंतर चिपळूण न.प.ची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निमित्ताने राजकीय आखाडा रंगला आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर आघाडी किंवा महायुतीला फारसे महत्त्व नसून व्यक्तिगत संपर्कावरच ही निवडणूक लढविली जात असते. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली प्यादी पटावर उतरविली आहेत. मात्र, प्रत्यक्षात चाल कुणाला द्यायची हे ठरवलं जातंय. नेत्यांच्या संगनमतातून सत्ताधारी किंवा विरोधी प्यादी मागे-पुढे सरकणार आहेत. यावरच चिपळूणचे राजकारण अवलंबून राहाणार आहे.
चिपळुणातील राजकारण कधीही कुणाला उमगणार नाही अशा पद्धतीने चालते. दोन विरोधी गट येथे कधीही आमनेसामने येत नाहीत तर पडद्यामागून बुद्धीबळाचे खेळ सुरू असतात. त्यामुळे कधी कुणाचा गेम होईल.. तर कोणावर नेम धरला जाईल.. हे चिपळूणच्या राजकारणात सांगता येत नाही. सुजाण मतदार लाभल्याने मतदारांच्या मनाचा देखील अंदाज घेता येत नाही. त्यामुळे चिपळूणची निवडणूक कायमच रंगतदार असते. यावर्षी मात्र त्यात अधिक भर पडणार आहे. कारण, चिपळूणवर कायमच वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे विभाजन झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेकवेळा विरोधी पक्षात बसलेली शिवसेना देखील दुभंगली आहे. त्यामुळे या चार पक्षांसाठी ही पहिली निवडणूक असून, नऊ वर्षांपूर्वीच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयावर भाजपदेखील आपली ताकद वाढली आहे अशा अविर्भावात आहे. त्यामुळे नागरिक मात्र सर्वांनी स्वतंत्र लढा, असा विचार करीत आहेत.
जर प्रत्येक पक्ष स्वबळावर लढला तर या निवडणुकीत ‘दूध का दूध.. पानी का पानी..!’ होईल असा विचार चिपळूणचा मतदारराजा करीत आहे. चिपळुणातील 28 जागांसाठी ही निवडणूक होत आहे तर नगराध्यक्ष जनतेतून निवडून जाणार आहे. मात्र, नेत्यांच्या वादावादीत आणि गट-तटात उमेदवार मात्र मेटाकुटीस आले आहेत. अनेकवेळा चिपळूणवर वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी प्रयत्न केला. त्यांनी युती व शहर विकास आघाडी करून पाहिली. मात्र, आजवर त्यांना यश मिळाले नव्हते. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी माजी आ. रमेश कदम यांच्याशी संधान बांधले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे पक्षाचे राजू देवळेकर यांच्यासह उर्वरित प्रभागात नगरसेवक पदासाठी देखील सेनेने अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची पंचायत झाली आहे. चिपळूण न.प.साठी ठाकरे शिवसेना 28 जागांसह नगराध्यक्ष पदावर उमेदवार देणारा एकमेव पक्ष ठरला आहे. काही अपक्षांच्या हातात देखील मशाल देण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीच्या ध्येयाला मशाल लावली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत ही मशाल धगधगत राहते की विझते हे पाहावे लागणार आहे. त्याआधीच काँग्रेसने महाविकास आघाडीत न जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले लियाकत शाह यांचाच एक उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे काँग्रेस आयात केलेले सुधीर शिंदे की दुसरा अर्ज भरलेले लियाकत शाह यांना रिंगणात ठेवते हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, काँग्रेसचे अद्याप आघाडीबरोबर सूत जुळलेले नाही.
महायुतीमध्ये देखील सारेकाही आलबेल नाही. वास्तविक महायुतीचे नेते चिपळुणात एकदाही एकाच व्यासपीठावर आल्याचे आजवर पाहायला मिळाले नाही. चिपळुणात झालेल्या महायुतीच्या बैठकीत पालकमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, भाजपा नेते प्रशांत यादव एकत्र आले. मात्र, त्यावेळी देखील अजित पवार राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम हे उपस्थित नव्हते. त्या पक्षाचे पदाधिकारी होते. मात्र, महायुतीच्या नेत्यांचे मनोमिलन झाले की नाही? हा प्रश्न आहे. याचा फटका या निवडणुकीत बसून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला उमेदवार अर्ज भरताना गाफील ठेवल्याचा आरोप होत आहे. विशेषकरून राष्ट्रवादीला 10 जागा सोडण्यात आल्या होत्या. तरीही त्या निश्चित जागांवर म्हणजेच प्रभाग क्र. 9 वर भाजपने आपली उमेदवारी जाहीर केली. अन्य एका जागेवर देखील असाच प्रकार झाला. त्यावरून महायुतीमध्ये ठिणगी पडली. राष्ट्रवादीला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर झाल्याने अखेर राष्ट्रवादीनेही नगराध्यक्ष पदासह 15 जागांवर आपले उमेदवार उभे केले तर दुसऱ्या बाजूला महायुती नव्हे तर युती म्हणून शिंदे शिवसेना व भाजप एकत्र येत 12/16 अशी युती करून अर्ज भरण्यात आले. अजूनही महायुतीला संधी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.