Ratnagiri Accident News Car falls into Jagbudi river on Mumbai-Goa National Highway
खेड : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दि.१९ रोजी पहाटे भरणे जगबुडी पुलावरून नदी पात्रात मोटार कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खेडनजीक जगबुडी नदीच्या पात्रात सोमवारी दि.१९ रोजी एक भीषण अपघात झाला. अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची कार नदीत कोसळून जागीच सर्वांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबईतील मिरा रोड येथून मिताली मोरे ही वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांसह माहेरी जात होती. देवरुख येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले असताना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेडजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार थेट जगबुडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. मोटारीतून विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत भाचा, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर हे प्रवास करत होते. त्यांच्या पैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे असे समजते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले, परंतु पाण्याखाली बुडालेल्या कारमधील पाचही प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.