

Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील डीके पोरा परिसरात भारतीय लष्कराच्या ३४ आरआर एसओजी शोपियान, सीआरपीएफ १७८ बटालियनच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांच्या दाोन साथीदारांना अटक केली. या दोघांकडून दोन पिस्तूल, चार ग्रेनेड, ४३ जिवंत काडतुसे आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक दहशतवादी हँडलर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये बसून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळघली होती. जिल्ह्यातील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या मंडी तहसीलमधील सावजियान सेक्टर आणि चांबर किनारी भागात स्थानिक पोलिस, स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) आणि लष्कराने शोध मोहीम राबवली. या भागात नियंत्रण रेषेच्या पलीकडे बसलेल्या स्थानिक दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या मदतनीसांवर कारवाई करताना, त्यांची घरे आणि लपण्याच्या ठिकाणांची झडती घेण्यात आली. यावेळी दोघांना अटक करुन मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराने रविवारी पूंछ जिल्ह्यात दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली. लष्कर आणि एसओजीच्या मदतीने, पोलिसांच्या अनेक पथकांनी जिल्ह्यातील १८ दहशतवादी सूत्रधार आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. अनेक घरांची झडती घेतली असता, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. यापूर्वीही, नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवादी कारवाया करणाऱ्या दोन दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.
शनिवार, १७ मे रोजी राज्य तपास यंत्रणेने (SIA) काश्मीर खोऱ्यात एक मोठी कारवाई केली होती. ११ स्लीपर सेलच्या घरांवर छापे टाकले होते. या काळात अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. याशिवाय, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शनिवारीच १३ दहशतवाद्यांचे सहाय्यकांना अटक केली होती.