

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा या तलारी फाटा नजीकच्या रासायनिक कारखान्याला रविवारी (दि.18 मे) दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचे लोळ तीन ते चार किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते, यावरून आगीची तीव्रता स्पष्ट होते. लोटे, खेड व चिपळूण येथील अग्निशामक दलांनी तब्बल तीन तासांनी आग नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेत लासा कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही आग लासा कंपनीच्या परिसरात लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगारांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील अन्य कारखान्यांना धोका पोहोचू नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे.
घटनास्थळी लोटे औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दल, चिपळूण न.प. व खेड न.प.चेअग्निशमन दल तातडीने दाखल झाले. त्यांनी सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवले. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक रासायनिक कारखाने कार्यरत असल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इतर कारखान्यांमध्ये सायरन वाजवून इशारा देण्यात आला. नागरिकांनी आणि कामगारांनी सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आगीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.