Upper Tehsildar Office Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri News | अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी रायपाटणचे पारडे जड?; महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला वेग

राजापूर पूर्व विभागातील भौगोलिक, प्रशासकीय आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने रायपाटण हे अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी योग्य

पुढारी वृत्तसेवा

Upper Tehsildar Office Raipatan Ratnagiri

राजापूर : प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत रायपाटणचा उल्लेख केल्यानंतर या विषयावरील चर्चेला पुन्हा वेग आला आहे. अंतिम निर्णय पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने आता सर्वांचे लक्ष अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

राजापूर पूर्व विभागातील नागरिकांच्या मते, भौगोलिक, प्रशासकीय आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने रायपाटण हे अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी सर्वाधिक सक्षम ठिकाण ठरू शकते. गावात पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, महाविद्यालय, सरिता जलमापन केंद्र, तालुका क्रीडा संकुल आणि इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप अशा विविध शासकीय व सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत. याच कारणांमुळे शासनाने यापूर्वीही रायपाटणची या कार्यालयासाठी निवड केल्याची चर्चा परिसरात आहे.

धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रायपाटणला 'मंदिरांचे गाव' म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावाला भौगोलिकदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान लाभले आहे. त्यामुळे प्रशासकीय केंद्र म्हणून रायपाटण अधिक उपयुक्त असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

रायपाटण परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित झाले असून भविष्यातील शासकीय कार्यालयांच्या विस्तारासाठी आवश्यक जागाही उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. कुपळा परिसरातील वन विभागाची विस्तीर्ण जमीन तसेच गावठाणातील शासकीय जागा भविष्यातील प्रशासकीय विकासासाठी उपयुक्त ठरू शकतात, असेही मत व्यक्त होत आहे.

याशिवाय रायपाटणमार्गे परुळे, भांबेड, साखरपा, देवरुख तसेच अन्य गावांशी थेट संपर्क असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनेही हे ठिकाण महत्त्वाचे मानले जात आहे. भविष्यात रायपाटण-खाडेवाडी ते ताम्हाणे दरम्यान प्रस्तावित रस्ता पूर्ण झाल्यास अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे अधिक जवळ येतील आणि नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महसूल मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर रायपाटणच्या बाजूने वातावरण अधिक सकारात्मक झाले असून अंतिम निर्णयात भौगोलिक सुविधा, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि भविष्यातील प्रशासकीय गरजांचा विचार करून रायपाटणलाच प्राधान्य मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT