

चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातील मोलकरीण व तिच्या साथीदाराने मिळून सुमारे ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सुयोग संतोष बेलवलकर (30, व्यवसाय- हॉटेल, रा. कळमुंडी, हनुमानवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३१ जुलै रोजी पहाटे ५ ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ या कालावधीत घर बंद असताना आरोपींनी घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.