राजापूर : जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी सातत्याने खड्डे पडत असल्याने हे खड्डे भरण्यासह रस्त्याची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी का करण्यात आली नाही? विकासकामाला विरोध नाही, पण सातत्याने पाण्याचा साठा होत असलेल्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवल्यास ते त्याठिकाणी टिकणार आहेत का? प्रशासन हा रस्ता ठेकेदारासाठी करतेय की लोकांसाठी? असे सवाल उपस्थित करीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पदाधिकार्यांनी जकात नाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यास विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली.
शहरातील जकातनाका ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसह शहरातील अन्य विकासकामांबाबत काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या पदाधिकार्यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पालिकेमध्ये भेट घेतली.
यावेळी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, नगर पालिकेतील माजी विरोधी गटनेते विनय गुरव, माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे, माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, दशरथ दुधवडकर, विणा विचारे, विजय गुरव, अनिल कुडाळी, कोदवली विभागप्रमुख संतोष हातणकर, माजी सभापती अभिजीत तेली, माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर, संजय कुवेस्कर, शहबाज खलिफे, प्राची शिर्के आदी उपस्थित होते.
सुमारे पावणेदोन कोटी रूपये निधी खर्च झालेला जकातनाका ते जवाहरचौक हा मुख्य रस्ता पहिल्या वर्षापासून वाहतो आहे. मुख्य रस्त्यावर सातत्याने खड्डे पडत असून त्याची पावसाळ्यापूर्वी डागडुजी का केलेली नाही? पेव्हर ब्लॉक टिकणार आहेत का? जर ते टिकणार नसतील तर लाखो रूपयांचा निधी खर्च करण्याचे नेमके प्रयोजन काय? असा सवाल माजी नगराध्यक्ष अॅड. खलिफे यांनी उपस्थित केला. मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गंत रस्त्यांच्या डागडुजीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सातत्याने वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू करण्यापूर्वी आठ दिवस रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवल्याने वाहन चालकांसह सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल शिवसेना शहरप्रमुख पवार, माजी विरोधी गटनेते गुरव यांनी उपस्थित केला. अनेक ठेकेदारांची बिले प्रलंबित असताना रस्त्याच्या कामासाठी निधी कुठून येतो? असा सवाल गुरव यांनी उपस्थित करत प्रलंबित बिलांकडे लक्ष वेधले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये माजी नगरसेवक बाकाळकर, गुरव, अनिल कुडाळी, कदम यांनीही भाग घेतला. विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने होणार्या कामाला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट करत मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्यास विरोध असल्याची भूमिका काँग्रेस-शिवसेना आघाडीच्या पदाधिकार्यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, जवाहर चौक ते जकातनाका या मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी नगर पालिकेच्या फंडातून पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार असल्याची माहिती नगर पालिका प्रशासनाने यावेळी दिली. या कामाचे सुमारे 7 लाख रूपयांचे अंदाजपत्रक बनवण्यात आल्याचेही यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जकातनाका ते जवाहर चौक मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे
रस्त्यांच्या डागडुजीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? उपस्थित केला प्रश्न
काँग्रेस, शिवसेना पदाधिकार्यांनी घेतली मुख्याधिकार्यांची भेट