

रत्नागिरी : लांजा-राजापूर मतदारसंघातील 27 छोट्या-मोठ्या धरणांची कामे भूसंपादन व इतर कारणांमुळे रखडली आहेत. या कामांना गती देण्यासाठी सुमारे 900 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, येत्या पावसाळी अधिवेशनात हा निधी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार सामंत म्हणाले की, सह्याद्रीच्या पायथ्यापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या या मतदारसंघातून तीन प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांमुळे मतदारसंघाचे चार भाग पडले असून, दळणवळण सुलभ करण्यासाठी मोठे पूल उभारून ग्रामीण भाग जोडण्याचे काम सुरू आहे. मतदारसंघासाठी मंजूर झालेले 27 धरणांचे प्रकल्प अनेक ठिकाणी भूसंपादनाअभावी थांबले आहेत. हा निधी मिळाल्यास सिंचनाचा आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल. यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यटनाच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या माचाळच्या विकासासाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, शासकीय जागेअभावी पर्यटन सुविधा उभारण्यात अडथळे येत असून, ग्रामस्थांशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. लांजा येथील डंपिंग ग्राऊंडवरून काहीजण नागरिकांची दिशाभूल करत आहेत, पण सत्य लवकरच समोर येईल, असेही ते म्हणाले. मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था, शाळा आणि इतर पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, घेरा यशवंतगड किल्ल्याची ढासळलेली तटबंदीची पाहणी आपण पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांसह केली. यावेळी तहसीलदार, बांधकाम अभियंता व अधिकारी उपस्थित होते. किल्ल्याची दुरुस्तीसाठी वापरलेले साहित्य हे निकृष्ट दर्जाचे होते हे दिसून आल्याचे आ. किरण सामंत यांनी सांगितले. यापुढे काम उत्कृष्ट होण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, शिवप्रेमी व माहितगार व्यक्तींचा यात समावेश करण्यात आल्याचेही आ. सामंत यांनी सांगितले.
मतदारसंघातील मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली आहे. अनेक टॉवरला वीजपुरवठा नाही, तर काही ठिकाणी टॉवरच नाहीत. यासंदर्भात आयोजित बैठकीला बीएसएनएल अधिकारी गैरहजर राहिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. खासगी कंपन्यांच्या अधिकार्यांशी चर्चा झाली असून, टॉवर उभारणी आणि वीजपुरवठ्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच पुन्हा बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदारांनी सांगितले.