Modi Documents pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News : अठराव्या शतकातील ओझर गावातील वतन प्रकरण उलगडले !

दोन मोडी दस्तावेजांतून वतन, कर्ज, खोती-पाटीलकीचे हक्क, जमीन व्यवहार, वारसाहक्काचा गुंता समोर

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : राजापूर तालुक्यातील ओझर गावाच्या अठराव्या शतकातील सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय इतिहासावर प्रकाश टाकणारे दोन महत्त्वाचे मोडी दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. या कागदपत्रांतून वतनाचा वारसा, दत्तकपुत्राचा प्रश्न, खोती-पाटीलकीचे हक्क, वडिलोपार्जित कर्ज, जमिनीचे व्यवहार, महसुली हिशेब आणि वतन वाटपाचा तत्कालीन संघर्ष यांची महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.

शके १७०८, पराभव संवत्सर, माघ शुद्ध प्रतिपदा या कालनोंदीचा एक दस्तावेज असून तो साधारण इ.स. १७८९ च्या आसपासचा असल्याचे दिसते. राजापूर प्रांत, विजयदुर्ग, सुभेदार, देशकुलकर्णी, मामलेदार तसेच सरखेल आंग्रे यांसारख्या तत्कालीन प्रशासकीय व सत्ताकेंद्रांशी संबंधित उल्लेख या कागदपत्रांत आढळतात.

दस्तावेजातील नोंदीनुसार महादाजी कृष्ण हे एकुलते एक असून त्यांना संतती नसल्याने त्यांच्या पश्चात वतनाचा वारस कोण, हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातून दत्तकपुत्र घेण्याचा विचार पुढे आला. रामाजी गणेश यांच्याकडे दत्तकपुत्राची मागणी करण्यात आल्याचा उल्लेख असून, सदाशिव घागवे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत याबाबत चर्चा झाल्याचे कागदपत्रातून दिसते. महादाजी कृष्ण यांना जिवंतपणी अन्न-वस्त्राचा सांभाळ व पुढे पुत्रत्व देण्याच्या व्यवस्थेचाही उल्लेख आहे.

या प्रकरणात वतनाचा अर्थ केवळ शेतीजमीन एवढाच मर्यादित नसल्याचेही स्पष्ट होते. गाव, घर ठिकाणे, शेतजमीन, भातशेती,झाडझाडोरा, माळ, गुरेढोरे, मानपान, खोती, पाटीलकी आणि अष्टाधिकार अशा विविध हक्कांचा वतनव्यवस्थेशी संबंध असल्याचे दस्तावेजात नमूद आहे. ओझरबरोबरच हरडी/दरडी (हर्डी) व बंदर कसबा या ठिकाणांचाही संदर्भ येतो. चार वतनांचा करार व त्यासाठी ३०० रुपये नजर सरकारात जमा केल्याची नोंदही आहे.

दुसऱ्या दस्तावेजात मात्र वतनाच्या कारभारावरून निर्माण झालेला संघर्ष व तक्रारीची बाजू समोर येते. महादाजी कृष्ण यांच्या व्यवहारामुळे वतन बुडत असल्याचा आरोप करण्यात आला असून, कर्जाचे व्यवहार, जुन्या देणी-घेणीचा हिशेब आणि वतनाच्या मालमत्तेवरील अधिकार यावरून वाद असल्याचे दिसते. दोन्ही पक्षांच्या वडिलोपार्जित कर्जाची वाटणी करण्याचाही प्रयत्न झाल्याचे कागदपत्रातून स्पष्ट होते.

विशेष म्हणजे सुमारे २० बिघे सेत जमीन आणि ५० ते ६० बिघे वरकस जमिनीशी संबंधित व्यवहाराचा उल्लेख दस्तावेजात आहे. या व्यवहाराला सदाशिवराम यांची साक्ष नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच विठ्ठल राम देशकुलकर्णी यांच्या ताब्यातील तीन वर्षांचा हिशेब, वतनाची कागदपत्रे, रुमाल, पेटारे आणि अन्य चीजबस्त महादाजी कृष्ण यांनी स्वतःकडे ठेवल्याची तक्रार करण्यात आली असून, ती परत करून हिशेब करण्याची मागणी करण्यात आली होती.

या वतनविवादात त्रिकलाजी शेठ, गोपाळ अनंत गोखले, परमानंद पाध्ये, कृष्णाजी कोंडदेव, गणू संभाजी यांसारख्या व्यक्तींचेही आर्थिक व प्रशासकीय संदर्भ येतात. वतनाच्या हक्कांबरोबरच सावकारी व्यवहार किती गुंतागुंतीचे होते, याचे चित्र या नोंदीतून दिसते.

या दस्तावेजातील आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे विजयदुर्गचे सरखेल आंग्रे. कर्जाच्या संदर्भातून वतन किंवा गाव सावकारी व्यवहारात विकत घेण्याऐवजी सावकारी ऐवज घ्यावा, अशी ताकीद सरखेल आंग्रे यांनी दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे ओझरच्या स्थानिक वतनविवादाचा संबंध तत्कालीन व्यापक प्रशासकीय आणि सत्ताकेंद्रांशी जोडला जात असल्याचे दिसते. वतनविवाद सोडविण्यासाठी मामलेदार, देशकुलकर्णी, जमीनदार आणि इतर स्थानिक मान्यवरांची भूमिका असल्याचेही दस्तावेजातून स्पष्ट होते.

दोन्ही पक्षांनी निम्मे-निम्मे गाव व वतन चालवावे, तसेच कर्ज आणि येणे-देणे आपापल्या वाट्याने घ्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. काही काळ तीन-तीन वर्षांच्या कालावधीत वसुली आणि कारभार चालविण्याची व्यवस्था झाल्याचाही उल्लेख आहे. या दोन्ही कागद पत्रांतून अठराव्या शतकातील कोकणातील वतनव्यवस्था, वारसाहक्क, दत्तकसंस्था, खोती-पाटीलकी, सावकारी, कर्जवाटणी, महसूलव्यवस्था आणि स्थानिक प्रशासन यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा प्राथमिक स्रोत उपलब्ध झाला आहे.

विशेषतः दुसऱ्या दस्तावेजाचा शेवटचा भाग फाटलेला असल्याने अंतिम कर्जवाटप आणि वादाचा निकाल काय लागला, हे निश्चित सांगता येत नाही. या दस्तावेजांचा अभ्यास भटाळी, राजापूर येथील संदीप सरखोत यांनी उपलब्ध करून दिलेल्या मूळ कागदांच्या आधारे ज्येष्ठ पत्रकार व मंदिर आणि इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT