Rajapur Flood Situation  Canva
रत्नागिरी

Rajapur Flood | राजापूर शहरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती, जवाहर चौक पाण्याखाली

Rajapur Flood Situation | नद्यांच्या पातळीत वाढ, व्यापाऱ्यांची धावपळ; नुकसानीचे पंचनामे सुरू

पुढारी वृत्तसेवा

मागील चार-पाच दिवसांपासून राजापूर तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. शहरातील मध्यवर्ती अशा जवाहर चौकात पुराचे पाणी शिरल्याने आणि पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने शहराकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. यामध्ये राजापूर आगाराच्या एसटी बससेवेचाही समावेश होता. या अनपेक्षित संकटामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी एकच तारांबळ उडाली.

नद्या धोक्याच्या पातळीवर, शहरात पाणीच पाणी

तालुक्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्जुना नदीला मोठा पूर आला. त्यातच शहरातून वाहणाऱ्या कोदवली नदीच्या पाण्याची पातळीही धोकादायकरित्या वाढल्याने राजापूर शहरातील पूरसदृश स्थितीत आणखीनच भर पडली.

जवाहर चौक जलमय, व्यापारी हवालदिल

शहरातील नेहमी गजबजलेला जवाहर चौक पुराच्या पाण्याने वेढला गेला होता. राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी वाढत होते आणि क्षणाक्षणाला पाण्याची पातळी उंचावत होती. यामुळे जवाहर चौकाच्या पुढे पाणी गेल्याने काही काळ धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू होती.

मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने शहराकडे येणारी एसटी सेवा आणि इतर वाहतूक बंद केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गही पाण्याखाली गेला होता. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी तातडीने आपल्या दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली.

ग्रामीण भागाशी संपर्क तुटला, पंचनामे सुरू

अर्जुना नदीला आलेल्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने शीळ, गोठणे-दोनीवडे, चिखलगाव या गावांचा शहराशी संपर्क तुटला असून येथील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. तालुक्याच्या इतरही अनेक भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या असून, प्रशासनाकडून नुकसानीचे रीतसर पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT