

गुहागर : शनिवारी सायंकाळी दोन तास झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीचा फटका पालशेत आणि असगोली गावाला बसला. पालशेत सावरपाटी येतील 8 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच असगोलीकडे जाणार्या सखल भागातील रस्ता पाण्याखाली गेला होता. असगोली खारवीवाडीतील नाल्याला पूर आल्याने नाल्यावरील पुलावर 3 फूट पाणी होते. पाण्याच्या लोंढ्यामुळे या पुलावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.
या वर्षी पावसाचा सर्वाधिक फटका गुहागर तालुक्याला बसताना दिसून येत आहे. 12 जून रोजी झालेल्या पावसाने नरवणमधील जनजीवन विस्कळीत केले होते. तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली वेगाने काम सुरू आहे. रस्त्यावरील दगड, माती हटविण्यात आली आहे. आता उतारावर भूमिगत वाहिन्यांसाठी खणलेले चर बुजविण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. 13 जूनला ठेकेदाराचा महिला प्रतिनिधी अधिकार्यांसमवेत दोन तास नरवण गावात उपस्थित होता. त्यावेळी अत्यंत गोड बोलून हे सर्व काम करुन देऊ असे या महिला प्रतिनिधीने सरपंच व अन्य ग्रामस्थांना सांगितले. तेव्हापासून या महिला प्रतिनिधी नरवण गावातून गायब झाल्या आहेत. बांधकामचे अधिकारी, कर्मचारी यांनी 13 जूनला रात्री दोनवाजेपर्यंत काम करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
दरम्यान शनिवारी (दि. 14) दुपारी तीन तासात पावसाने गुहागरला झोडपले. पालशेत, वरवेली, असगोली, गुहागर या भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने नदीनाले वेगाने प्रवाहित झाले. असगोली खारवीवाडीतील नाल्यात वेगाने पाणी आल्याने नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूची जमीन खचली, पुलावरील सर्व डांबर उखडून गेले.? ? पुलावरुन 3 फूट पाणी वाहत असतानाच ते लोकवस्तीतही शिरले. नाल्याशेजारील पालशेतकरांच्या घराला पाण्याने वेढले होते. असगोलीत जाणार्या रस्ता देखील प्रथमच पाण्याखाली गेला होता.
पालशेत, वरवेलीमध्ये रस्त्यांवर पाणी होते. या पावसामुळे वरवेली शाळेजवळ दरड कोसळली. पाटपन्हाळे येथील एका घराचा बांध कोसळला. पालशेत आगडी मंदिराजवळ राकेश जाक्कर यांच्या घराजवळाचा बांध कोसळला. तसेच पालशेत सावरपाटी व पालशेत पाच माड परिसरात घरामंध्ये पाणी शिरले. सायंकाळी 6 च्या सुमारास पाऊस थांबल्यावर पुराचे पाणी ओसरले. मौजे पालशेत सावर पाटी भागात सततच्या? ? मुसळधार पावसाने पाणी भरले असून 7-8 घरात पाणी शिरले आहे, तसेच आगडी मंदिर येथे योगेश जाक्कर यांच्या घरात मागच्या बाजूस दरडीचा भाग कोसळ्याने माती घरात आली आहे. झालेल्या नुकसानाचा पंचनामा लवकरच सादर करण्यात येईल, असे महसूलकडून सांगण्यात आले आहे.