

पणजी : राज्यातील किनारपट्टीची वाढती धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने नेदरलँडमध्ये यशस्वी ठरलेले ‘सॅण्ड मोटार’ तंत्रज्ञान गोव्यात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या नवकल्पनात्मक तंत्रज्ञानामुळे किनार्यांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गोव्याच्या किनार्यांची धूप होण्यापासून वाचवण्यासाठी आता विज्ञानाच्या मदतीने एक नवा मार्ग स्वीकारला जात असून, भविष्यात हे तंत्रज्ञान अन्य किनारी राज्यांसाठीही दिशादर्शक ठरू शकते. या तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी मात्र स्थानिकांच्या सहभागावरही अवलंबून असेल. त्यामुळे राज्य सरकार पंचायती, पर्यावरण कार्यकर्ते व शास्त्रज्ञ यांच्या सल्ल्याने हा प्रकल्प राबवणार आहे. राज्य सरकारने या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून प्रारंभी निवडक किनार्यांवर त्याची चाचणी घेण्याचे ठरवले आहे. सध्या धूपग्रस्त काही भागांमध्ये समुद्रशास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली सॅण्ड मोटारसाठी आवश्यक वाळूची मात्रा, समुद्रप्रवाहांचे विश्लेषण व स्थानिक पर्यावरणावर होणार्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे.
नेदरलँडमध्ये 2011 मध्ये पहिल्यांदा हे तंत्रज्ञान वापरले गेले. 21.5 दशलक्ष घनमीटर वाळू समुद्रात टाकून एक कृत्रिम भूभाग तयार केला, जो कालांतराने समुद्राच्या लाटांमुळे विस्तृत भागात विखुरला गेला व किनार्यांचे संरक्षण अधिक मजबूत झाले. या प्रयोगामुळे किनार्यांच्या नैसर्गिक संरचनेला धक्का न लागता दीर्घकालीन संरक्षण मिळाले.
”सॅण्ड मोटार” हे एक पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात वाळू कृत्रिमरित्या किनार्याला लागून समुद्रात टाकली जाते. समुद्राच्या प्रवाहांमुळे आणि लाटांच्या नैसर्गिक गतीमुळे ही वाळू हळूहळू आजूबाजूच्या किनार्यांवर नैसर्गिक पद्धतीने पसरते. त्यामुळे धूप रोखण्यासाठी एक प्रकारची नैसर्गिक ढाल तयार होते.