नंदिनी कदम यांचे अभिनंदन करताना शिवसेना जिल्हा संघटक विलास चाळके, राजू कुरूप, तालुकासंघटक दीपक नागले उपसभापती अभिजित गुरव, अशपाक हाजू आणि अन्य पदाधिकारी  Pudhari
रत्नागिरी

Rajapur PS Election| राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नंदिनी कदम, उपसभापतीपदी अभिजीत गुरव बिनविरोध

जापूर पंचायत समितीमध्ये एकूण १२ जागा असून त्या सर्व महायुतीच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Nandini Kadam Chairperson Rajapur PS

राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी नाटे पंचायत समिती गणाच्या सदस्या नंदिनी नितीन कदम यांची, तर उपसभापतीपदी धोपेश्वर गणाचे भाजपचे सदस्य अभिजीत गुरव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत केले.

राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण १२ जागा असून त्या सर्व महायुतीच्या ताब्यात आहेत. त्यापैकी शिवसेनेच्या ११ तर भाजपची एक जागा आहे. यापूर्वी सभापती पदासाठी ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला’ असा आरक्षण प्रवर्ग जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पंचायत समिती गणांच्या आरक्षणामध्ये तालुक्यातील नाटे आणि ताम्हाणे या दोन गणांचा समावेश करण्यात आला होता. यात नाटे गणाच्या सदस्या नंदिनी कदम यांना सभापतीपदाची संधी मिळाली, तर धोपेश्वर गणाचे भाजपचे एकमेव सदस्य अभिजीत गुरव यांची उपसभापतीपदी निवड झाली.

सोमवार (दि. ९) रोजी राजापूर पंचायत समितीच्या किसान सभागृहात सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. जस्मिन उपस्थित होत्या. त्यांच्यासह प्रभारी गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. सभापती पदासाठी नंदिनी कदम आणि उपसभापती पदासाठी अभिजीत गुरव यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने ही निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती नंदिनी कदम व उपसभापती अभिजीत गुरव यांनी पंचायत समितीतील आपल्या दालनात प्रवेश केला. यावेळी शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा संघटक विलास चाळके, तालुकाप्रमुख दीपक नागले, लांजाचे राजू कुरूप, भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे, भाजप प्रदेश सदस्या शिल्पा मराठे, श्रुती ताम्हनकर, अनिल करगुटकर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विकासासाठी प्रयत्नांची अपेक्षा
निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या उपविभागीय अधिकारी डॉ. जस्मिन यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. राजापूर तालुक्यातील विकासाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काही विशेष बाबी

  • राजापूर पंचायत समितीच्या इतिहासातील नवव्या महिला सभापती म्हणून नंदिनी कदम यांची निवड झाली.

  • भाजपला दुसऱ्यांदा उपसभापती पदाची संधी मिळाली. यापूर्वी भाजपचे प्रकाश गुरव हे १४ मार्च १९९८ ते १४ मार्च १९९९ या कालावधीत उपसभापती होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT