Ratnagiri News : शिवने-करंबेळे सीमेवर रंगला पालखी भेटीचा सोहळा

ढोल ताशाचा गजर आणि ग्रामदेवतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला; हजारो भाविकांनी गर्दी
Ratnagiri News
शिवने-करंबेळे सीमेवर रंगला पालखी भेटीचा सोहळा
Published on
Updated on

साडवली : ढोल-ताशाचा गजर आणि ग्रामदेवतेच्या नावाचा जयघोष करत संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे व शिवणे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा बुधवारी रंगला. यावेळी संपूर्ण परिसर ग्रामदेवतेच्या जयघोजोषाने घुमला होता. हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

करंबेळे-शिवणे येथील सीमेवर देवरुख-संगमेश्वर या राज्यमार्गावर पालख्यांची आगळीवेगळी अनोखी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते. ही पालख्यांची भेट म्हणजे केवळ दोन गावातीलच नव्हे तर तालुक्यातील भक्तगणांसाठी एक पर्वणीच असते. आजूबाजूच्या गावातील शिमगोत्सव संपन्न झालेले असल्याने करंबेळे व शिवणे गावच्या सीमेवर होणारी ही पालख्यांची भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी मोठी यात्रादेखील भरली होती.

शिवणे गावच्या पालखीतील ग्रामदेवता रवळनाथ, नवलाई व पावणाई असून करंबेळे गावच्या पालखीत ग्रामदैवत स्वयंभू गांगोबा, देवी निनावी व वाघजाई असे आहे. बुधवारी दुपारी दोन्ही गावांतील पालख्या वाजत गाजत जल्लोषात सीमेवर आणल्या गेल्या. यावेळी भक्तगणांनी काहीवेळ पालख्या सीमेवर नाचवल्या. त्यानंतर 3.10 वाजण्याच्या सुमारास दोन्ही पालख्यांची भेट घडवून आणताना भक्तगणांनी आपल्या खांद्यावर मानकऱ्यांना घेऊन दोन्ही पालख्यांची ही अनोखी भेट घडवून आणली. या भेटीमध्ये दोन्ही पालख्यांमधील ओटींची अदलाबदल करण्यात आली. हे या पालखी भेटीचे वैशिष्ट्य आहे. या भेटी दरम्यान पालखी जड येतात असे सांगितले जाते. या पालखी उत्सवाला सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा असल्याचे मानकऱ्यांकडून सांगिण्यात आले. पूर्वी ही दोन्ही गावे एकच होती आणि या गावांचे विभाजन झाल्यानंतर या दोन बहिणीदेखील वेगळ्या झाल्या व या बहिणींची भेट शिमग्याच्या या उत्सवाला होत असते. उत्सवादरम्यान मार्गाच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. या ठिकाणी मोठी यात्रा भरली होती. आबाल वृद्धांनी या पालखी भेट सोहळ्याचा आनंद लुटला.

या सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मार्गावर वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी देवरुख व संगमेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संगमेश्वरच्या पोलिस निरीक्षक बाळकृष्ण चव्हाण व देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news