रत्नागिरी : लांब व मध्यम पल्ल्याच्या एसटी बसेस वेळेवर सोडण्याचे आदेश एसटी महामंडळाने जिल्ह्यासह राज्यभरातील आगारास दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बसेस नियोजननुसार सुटत असल्याने जिल्ह्यामधील आगारातील प्रवासी सेवेवर परिणाम फारसा दिसत नाही. जिल्ह्यातील पहिली एसटी बस सुटताना आगार व्यवस्थापक स्थानकात असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्यामुळे त्याचे परिणाम आगाराचे उत्पन्न व भारमानावर होत आहे. यामुळे आगार व्यवस्थपकांना दर सोमवारी पहिली बस सुटण्याच्या वेळेपासून आगारात उपस्थित राहण्याचे आणि सर्व फेऱ्या वेळेत सुटीत याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रत्येक आगार प्रमुखांची बसस्थानकात नियमित फेरी असते. वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिलेल्या निर्देशानुसार आगार व्यवस्थापकांना दर सोमवारी बसस्थानकात हजर राहून केलेल्या कामाचा तपशील स्वताच्या तसेच विभाग नियंत्रकांच्या नोंदवहीत नोंदवायचा आहे. आठवड्यातील प्रत्येक सोमवारी आगार प्रमुखांनी आगारातून पहिली बस सुटण्याच्या वेळेपासून हजर राहण्याचे आदेश असून काही बस स्थानकात आगार प्रमुखांना साडेपाच वाजल्यापासून बसस्थानक गाठावे लागते. आगारप्रमुखांना दिलेल्या सूचनांचे पालन होते का नाही याची आकस्मिक तपासणी विभाग नियंत्रक आणि विभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.