

सांगोला : सांगोला बसस्थानकामधून एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे काळाची गरज आहे.
सांगोला बसस्थानक हे रत्नागिरी-नागपूर या महामार्गावरील व इंदापूर-विजापूर या राज्यमहामार्गावरील प्रमुख बसस्थानक आहे. यामुळे या बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. तसेच सांगोला शहरामध्ये दोन मोठी महाविद्यालये, आयटीआय, दोन इंजिनीअरिंग कॉलेज व खासगी शाळाही मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे ग्रामीण भागातून शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी बसेस वेळेवर सुटत नाहीत. सकाळी गावाकडून शाळेला येतानाही वेळेत बस येत नाही.
त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर बसस्थानकात वेळेत बस लागत नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना तासन्तास बसस्थानकमध्ये एसटी बसची वाट पाहावी लागते. यामध्ये विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच रुग्ण, वयोवृद्ध, महिला यांनाही गावाकडे जाण्यासाठी वेळेत बसेस लागत नाहीत. रात्री उशिरापर्यंत एसटी बसची वाट पहावी लागते. सांगोला बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस वेळेत लागाव्यात, अशी मागणी विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवासी यांच्यामधून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय
शालेय विद्यार्थ्यांना बसस्थानकामधून सोडण्यात येणाऱ्या बसेस वेळेवर सुटत नाहीत. यामुळे विद्यार्थिनींना ताटकळत बसची वाट पाहत तासन्तास बसावे लागते. बस वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थिनींना टवाळखोर मुलांपासून त्रासही सहन करावा लागत आहे. दुपारी 12 ते 2 व सायंकाळी 5 ते 6 यावेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेस सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे.