प्रवीण शिंदे
दापोली : हापूस आणि काजू या रोख पिकांच्या तुलनेत जिल्ह्यात नारळ लागवडीकडे शेतकर्यांचा कल मागील काही वर्षांपासून सातत्याने घटताना दिसत आहे. उत्पादन कमी आणि मागणी कायम जास्त असल्याने नारळाचे दर सध्या अक्षरशः गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात नारळ एक नग 50 ते 60 रुपये, तर शाहळीचे दर तब्बल 70 ते 80 रुपये इतके झाले आहेत.
त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली असून नारळाचे भाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहेत. फयान वादळाचा किनारपट्टी भागातील नारळबागांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर पुनर्लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना, अनुदानाची तरतूद असूनही शेतकर्यांनी त्या फारशा स्वीकारल्या नाहीत.
कारण नारळ लागवडीसाठी मुबलक पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट कायम असल्याने या क्षेत्रात नव्याने गुंतवणूक करण्यास शेतकरी कचरतात. त्यात वन्यप्राण्यांचा, विशेषतः माकड, वानरांचा प्रचंड उपद्रव असल्याने नारळ उगवण्याआधीच त्याचे नुकसान होण्याची शक्यता अधिक राहते.
एका रात्रीत झाडावरील फळे साफ करण्याचा वानरांचा उपद्रव मोठा डोकेदुखी बनला आहे. जिल्ह्यात नारळ लागवडीचे क्षेत्र सध्या फक्त 5 हजार 360 हेक्टर इतके आहे. प्रताप, केराबस्तर, गंगाबोंडम, ग्रीन ड्वार्फ, ऑरेंज ड्वार्फ, बाणवली अशा उच्चउत्पादी संकरित जाती आहेत, योग्य व्यवस्थापन केले तर एक झाड वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढे उत्पन्न देऊ शकते, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मात्र नैसर्गिक आपत्ती, खर्चिक व्यवस्थापन आणि वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव यामुळे या पिकाकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. स्थानिक उत्पादन घटल्याने जिल्ह्यात लागणारा नारळ आता मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांवर अवलंबून राहून मागवला जात आहे. परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात नारळ पूर्णपणे बाह्य राज्यांवर निर्भर राहण्याची भीती कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.