

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथे एका कारच्या मागील बाजूची काच फोडून अज्ञाताने भर दिवसा पिशवित ठेवलेली तब्बल 10 लाख रुपयांची रोख रक्कम लांबवली. चोरीची ही घटना सोमवार 1 डिसेंबर रोजी दुपारी 12.15 ते 1 वा. कालावधीत घडली आहे.मुबीन मोहम्मद मुल्ला (50, रा. गोळप, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हे मच्छिमार व्यावसायिक आहेत.
त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या एकूण 4 पर्सनेट बोटी असून त्यावर सुमारे 100 ते 125 खलाशी आहेत. त्या खलाशांना आठवड्याच्या खर्चासाठी पैसे देण्यासाठी फिर्यादीने त्यांच्या सुनांच्या नावे असलेल्या फेडरल बँक येथून चेकव्दारे रोख 10 लाख रुपये काढले. ही रक्कम पिशवीत ठेवून ती पिशवी आपल्या ताब्यातील कार (एमएच-08-बीई-5786) मध्ये ड्रायव्हर सिटच्या बाजूच्या सिटखाली ठेवून ते मिरकरवाडा येथे गेले.
मिरकरवाडा जेटी रोडला त्यांनी आपली कार पार्क करुन ते चालत मिरकरवाडा जेटीजवर गेले होते. ही संधी साधत अज्ञाताने त्यांच्या कारच्या मागील डावी काच फोडून गाडीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने ड्रायव्हर सिटच्या बाजुच्या सिटखाली ठेवलेली रोख 10 लाख रुपये असलेली पिशवी घेत पोबारा केला.
काही वेळाने फिर्यादी मुबीन मुल्ला कार पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना गाडीची मागील डावी बाजूची काच कोणत्यातरी कठीण वस्तून फोडलेली दिसून आली. तसेच गाडीतील रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.