Banda Minor Assault Case  file photo
रत्नागिरी

Banda Minor Assault Case | बांद्यात नात्याला काळीमा फासणारी घटना

अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी नातेवाईकाला अटक, शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे समुपदेशनादरम्यान उघड झाला धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

बांदा : नात्या विश्वासाला काळीमा फासणारी संतापजनक घटना बांदा शहरात उघडकीस आली आहे. गोवा राज्यातील एका हायस्कूलमध्ये नववी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन = विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी अबुसाद इब्राहिम शहा (३०, रा. मुस्लिमवाडी, बांदा) याला अटक केली आहे. संशयिताविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी गोवा राज्यातील सीमाभागातील एका - हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. संशयित हा विद्यार्थिनीच्या जवळच्या नात्यातीलच आहे. या नात्याचा गैरफायदा घेत तो गेल्या काही काळापासून विविध आमिषे दाखवून तिला आपल्या घरी बोलावत असे. घरात कोणी नसल्याची संधी साधून तिच्याशी अश्लील वर्तन करणे, अयोग्य स्पर्श करणे तसेच वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपी हा जवळच्या नात्यातील असल्याने आणि त्याच्या धमक्यांमुळे विद्यार्थिनी भीतीपोटी हा प्रकार कोणालाही सांगू शकली नव्हती. त्यामुळे ती सतत मानसिक तणावाखाली व भीतीच्या छायेत वावरत होती.

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनीच्या वागण्या-बोलण्यात झालेला बदल, तिची खचलेली मानसिक अवस्था आणि अभ्यासातील अनास्था शाळेतील एका शिक्षिकेच्या निदर्शनास आली. विद्यार्थिनीची मानसिक स्थिती काहीशी अस्वस्थ असल्याचा संशय आल्याने शिक्षिकेने तिचे समुपदेशन केले. विश्वासात घेऊन संवाद साधल्यानंतर विद्यार्थिनीने आपल्यावर नात्यातील व्यक्तीकडून सातत्याने लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती शिक्षिकेला दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शिक्षिकेने तात्काळ स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली. संस्थेच्या माध्यमातून गोवा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गोवा पोलिसांनी बांदा पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तसेच विद्यार्थिनीच्या पालकांनाही याबाबत कळविण्यात आले. पालकांनी बांदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच बांदा पोलिसांनी गुरुवारी रात्री मुस्लिमवाडी परिसरातून संशयित अबुसाद शहा याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने संशयिताला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पुढील तपास पोलीस सहा. निरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत. या घटनेमुळे बांदा परिसरात संतापाची लाट पसरली असून, अशा प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT