दीपक कुवळेकर
रत्नागिरी ः
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं,
मोरेश्वरं सिद्धिदं|
बल्लाळो मुरुडं विनायकमहं,
चिन्तामणि स्थेवरं
या मंजूळ स्वरांबरोबरच ढोल-ताशे, सनई-चौघडे, फटाक्यांची आतषबाजी, हर हर मार्लेश्वर, शिव हरा... शिव हरा...च्या घोषात सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या श्री देव मार्लेश्वर आणि साखरपा येथील गिरीजा देवी यांचा कल्याणविधी (लग्न सोहळा) बुधवारी शुभमुहूर्तावर मानकरी आणि राज्यातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडणार आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर हे अत्यंत जागृत आणि निसर्गरम्य देवस्थान आहे. श्री देव मार्लेश्वर (शिव) आणि गिरीजा देवी (पार्वती) यांच्या विवाहाचा इतिहास आणि त्यामागील परंपरा अत्यंत रंजक आहेत. मार्लेश्वर आणि गिरीजा देवी यांच्या विवाहामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. त्यानुसार शिवाचे वास्तव्य: असे म्हटले जाते की, भगवान शिव सह्याद्रीच्या जंगलात वावरत असताना त्यांना गिरीजा नावाची एक सुंदर गोपी (काही कथांनुसार ती स्थानिक राजाची किंवा गवळ्याची कन्या होती) आवडली. त्यानुसार तिच्या वडिलांकडे तिचा विवाहासाठी हात मागितला.
गिरीजा देवीच्या वडिलांनी लग्नासाठी काही कठीण अटी घातल्या होत्या. ज्या शिवाने आपल्या सामर्थ्याने पूर्ण केल्या. त्यानंतर त्यांचा विवाह या सह्याद्रीच्या कुशीत संपन्न झाला. विशेष म्हणजे, विवाहासाठी मुलीला जी मागणी घालण्याची प्रथा (पाचात मागणी) आहे. ती आजही मानकऱ्यांच्या साक्षीने पार पाडली जाते. लग्न सोहळ्यासाठी सुमारे 360 मानकरी उपस्थित असतात.
श्री देव मार्लेश्वरची मुख्य पिंडी एका नैसर्गिक गुहेत आहे. पूर्वी हे स्थान मुरादपूर येथे होते. परंतू, मुराद राजाच्या कारभाराला कंटाळून आंगवली येथे गेले. त्यानंतर एकांत ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत देव मार्लेश्वर या दुर्गम गुहेत प्रकट झाले, अशीही एक कथाही सांगितली जाते.मार्लेश्वर आणि गिरीजा देवी यांचा विवाह दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी अत्यंत थाटामाटात लावला जातो. मार्लेश्वर हे वर (नवरदेव) मानले जातात, तर साखरपा येथील गिरीजा देवी या वधू मानल्या जातात. लग्नासाठी गिरीजा देवीची पालखी साखरप्याहून ढोल-ताशांच्या गजरात मार्लेश्वरला येते. विवाहाच्या काही दिवस आधीपासून विधींना सुरुवात होते. देवाला आणि देवीला रीतसर हळद लावली जाते. हे विधी आंगवली येथील मूळ मठात पार पडतात. मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो. यावेळी हिंदू लिंगायत पद्धतीने मंगलाष्टके म्हटली जातात. लाखो भाविक या लग्नकार्याला उपस्थित राहून अक्षता टाकतात.