

पुढारी ऑनलाईन डेस्क - मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील एक धार्मिक स्थान आहे. येथील डोंगररांगेतील एका गुहेत मार्लेश्वर हे प्रसिद्ध शिव मंदिर आहे. नागांचे वास्तव्य असलेले स्थान अशी त्याची ख्याती आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मार्लेश्वरचा धबधबा. याठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मार्लेश्वर हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं ठिकाण आहे. भर पावसात देखील याठिकाणी खूप भाविक अन् पर्यटक येत असतात. मार्लेश्वरचे मंदिरच नाही तर येथील धबधबा देखील विलोभनीय आहे. मार्लेश्वरचे मंदिर गर्द गुहेत असल्याने भाविक-पर्यटक इथे आवर्जून जातात.
मार्लेश्वर एक प्राचीन मंदिर असून भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराची ख्याती म्हणजे संपूर्ण मंदिर एका गुहेत आहे. दुसरी खासियत म्हणजे गुहेत दीप, समईचाच उजेड असतो. मारळमधून पुढे जाताना आजूबाजूला हिरवीगार झाडी निदर्शनास पडते. मार्लेश्वरची मुख्य कमान असून प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर काही अंतरावर पार्किंगची सोय आहे. अगदी प्रवेशद्वारापासूनच हार, फुले, खेळण्यांची वेगवेगळी दुकाने पाहायला मिळतात. अन्नपदार्थ आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स दिसतात. मार्लेश्वरच्या गुहेपर्यंत जाण्यासाठी तब्बल ५२० पायऱ्या चढाव्या लागतात. सिमेंट आणि दगडी पायऱ्यांवरून सहजतेने मंदिरापर्यंत पोहोचता येते. पायऱ्यांवरून जात असताना डोंगर कपारावरून खळखळून वाहणारे पाणी मोहून टाकते. इथे विविध पक्षी आणि माकडांचा वावर अधिक असतो. पायऱ्यांवरून जाताना उंच डोंगरांचे विलोभनीय दृश्य नजरेस दिसते.
डोंगरातच ही गुहा असून गर्द काळोखातील हे महादेवाचे मंदिर मनाला शांती देणारे आहे. गुहेत जाण्यासाठी एका छोट्या दरवाज्यातून एकच व्यक्ती आतमध्ये जाऊ शकते. गुहा मात्र पाच-दहा माणसे बसू शकतील, इतकी मोठी आहे. गुहेत गेल्यानंतर महादेवाची पिंड असून आजूबाजूला खूप साऱ्या पितळेच्या नागाच्या मूर्ती दिसतात. काही अन्य देवदेवतांची दगडी शिल्पे आहेत. गुहेस लाईट कधीच लावली जात नाही. २४ तास इथे समई, दिवे लावले जातात. एक वेगळाच अनुभव तुम्हाला याठिकाणी मिळेल.
पावसाळ्यामध्ये हा धबधबा प्रवाहित होतो. लक्षवेधी मार्लेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रुप पावसाळ्यात पाहता येते. कुटुंबासह जाणार असाल तर पावसाळ्यानंतर जावे. तेव्हा धबधब्यापर्यंत पोहोचता येते. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी १२-१५ मिनिटे छोटे-मोठे दगड चढावे लागतात. पण धबधब्याजवळ पोहोचताच निळेशार नितळ पाणी तुमचे स्वागत करायला तयार असते. धबधब्याच्या पाण्यात उतरताही येते. परिवारासह तुम्ही या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
कोल्हापूर-वाघबीळ-शाहूवाडी-मलकापूर-वारुळ-आंबा घाटातून जाताना उजवीकडे एक छोटेसे मंदिर आहे. त्याला लागून एक कच्चा रस्ता जातो, जो मार्लेश्वर मंदिराजवळ जाणारा आहे.
दुसरा रस्ता -
कोल्हापूर-वाघबीळ-शाहूवाडी-मलकापूर-वारुळ-आंबा घाट उतरल्यानंतर देवरुखमधून मारळ या गावातून जावे लागते.
मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच अनेक दुकाने तुम्हाला पाहायला मिळतील. शोभेच्या वस्तू, खेळणीची दुकाने, लाकडी खेळणी, सौंदर्य प्रसाधने, कोकम, लस्सी, ताक, लिंबू सरबतची अनेक दुकाने आहेत. ताजी कोकम फळांची चव इथे चाखायला मिळते.
तांदळाच्या उकडी मोदकावर साजूक तुपाची सोडलेली धार तोंडाला पाणी सुटणारी आहे. शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवणाच्या थाळीत तांदळाची भाकरी, झुणका, पापड, लोणचे, भात, सोलकढी, भाज्या, भरलेले वांगे असे पदार्थ मिळतात.
आंगवलीतील मंदिर - श्री देव मार्लेश्वर हे जुने मंदिर असून पाहण्यासारखे आहे.
सोमेश्वर मंदिर, राजवाडी - देवरुख-संगमेश्वर-धामणी-राजवाडी अशा मार्गाने या गावात पोहोचता येते. तर चिपळूणहून संगमेश्वरकडे जात असताना राजवाडी येथे महामार्गापासून आत जवळ असलेले हे मंदिर आहे. शास्त्री नदी पूल आरवली क्रॉस करून पुढे गेला की एक गरम पाण्याचे कुंड आहे. पुढे एक भग्न मंदिर आणि तिथं गरम पाण्याचे आणखी एक कुंड आहे. तेथून पुढे साधारण ३ किमी अंतरावर सोमेश्वर राजवाडीचा फाटा (ता. संगमेश्वर) आहे. राजवाडी गावात एक सुंदर मंदिर आहे! घनदाट झाडीत वसलेले सोमेश्वर मंदिर हे दोन गाभाऱ्यांमुळे खास ठरते. खालच्या गाभाऱ्यात सोमेश्वर महादेव तर वरच्या गाभाऱ्यात नागधारण गणेशाची मूर्ती आहे. राजवाडी परिसरात गरम पाण्याची कुंडे आहेत. तुरळ येथेही गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात.
कर्णेश्वर मंदिर - रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर याठिकाणी कर्णेश्वराचे प्राचीन मंदिर असून ते पाहण्यासारखे आहे. कसबा पेठ येथील सरदेसाई वाडा, छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्थळ, सप्तेश्वर मंदिर अशी ठिकाणे पाहता येतील.