चिपळूण शहर : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कुणाचीही किती युती, आघाडी होऊ दे. मात्र, महापालिकांवर सत्ता युतीचीच येऊन तेथील महापौर महायुतीचाच होईल, असा विश्वास ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
चिपळूण येथे पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पालकमंत्री सामंत चिपळूण दौर्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आगामी महानगरपालिका निवडणुकीत आमचीच सत्ता येईल. कुणाच्या कितीही युती, आघाडी होऊदे. महापौर आमचाच असेल. चिपळूणच्या विकासकामांबाबत धोरणात्मक नियोजन व निर्णयासाठी मंत्रालयात एक स्वतंत्र बैठक लवकरच घेतली जाईल. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अडचण आल्यास त्यानंतर ही बैठक होईल. या बैठकीत चिपळूणच्या विकासकामांबाबत नियोजन करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल व त्यासाठी निधीच तरतूद देखील केली जाईल. नुकत्याच निवडणुकीतून पराभूत झालेले उमेदवार महायुतीच्या कुठल्याही पक्षात सहभागी झाले तर त्यांच्या कोणत्याही कामांमध्ये अडचणी येणार नाहीत, असे सांगितले.
कंपनी नको की सामंत नको?
सध्या समाजमाध्यमांवर लोटे एमआयडीसीतील?एका कंपनीसंदर्भात भाष्य केले जात आहे. मी समाजमाध्यमांचा आदर करतो. मात्र, या कंपनीसंदर्भात कंपनीपेक्षा मलाच जास्त लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे कंपनी नको की सामंत नको, असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, कंपनीबाबत सर्व चौकशीची प्रक्रिया व माहिती घेणे सुरू आहे. कंपनीवर आतापर्यंत कार्यवाही सुरू नाही. तरीदेखील संपूर्ण माहिती घेतल्यानंतर कंपनीचे उत्पादन पर्यावरण व मानवी जीवनास हानिकारक असल्यास कंपनी उत्पादन बंद करण्यास भाग पाडले जाईल, असे ना. उदय सामंत म्हणाले.