

चिपळूण शहर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त ठिकाणी समन्वय करून निवडणुका लढण्याचा निर्णय तीनही पक्षांच्या प्रमुखांनी घेतला असून, त्यानुसार येथील निवडणूकदेखील तीनही पक्ष महायुती म्हणून लढणार आहेत. या निवडणूक निकालानंतर 3 डिसेंबरला महायुतीचाच नगराध्यक्ष असेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री व शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी (दि. 11) पत्रकार परिषदेत दिली.
येथील अतिथी हॉटेलच्या सभागृहात पालकमंत्री ना. सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तसेच अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रमुख यांच्यासोबत चर्चा व बैठक झाली. यावेळी माजी आमदार राजन साळवी, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपचे नेते प्रशांत यादव, माजी आ. सूर्यकांत दळवी, भाजपचे केदार साठे, राहुल पंडित, राजेश बेंडल, माजी आ. संजय कदम, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी आदी उपस्थित होते.
दरम्यान, बैठकीनंतर यासंदर्भात माहिती देताना ना. सामंत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागते. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी तिढा आहेच. एक-एक प्रभागात तसेच नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. या सर्वांना एकत्र घेऊन निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे लवकरच नगराध्यक्ष पदासहीत महायुतीमधील नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा केली जाईल. मात्र, महायुती म्हणूनच जिल्ह्यात लढणार याची घोषणा आज चिपळुणात करीत आहोत.