Mahad's Swaraj Dharia's remarkable success in global education
खेड : पुढारी वृत्तसेवा
कोकणवासीयांसाठी आणि विशेषतः महाडसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी आहे. महाडचे सुपुत्र स्वराज किशोर धारिया याने जगातील अग्रगण्य शिक्षणसंस्था एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट (MIT Sloan, USA) येथून एमबीए पदवी मिळवली आहे.
स्वराज हा मागील ४० वर्षांतील कोकणातून एमआयटी, एमबीए मिळवणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. ही गोष्ट संपूर्ण कोकणासाठी सन्मानाची आहे. त्याचा हा शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास अचंबित करणारा असून अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे.
स्वराजने आपले शिक्षण वेल्लोर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीसह सुरू केले. त्यानंतर त्याने अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटी येथून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी संपादन केली. शिक्षणासोबतच त्यांनी फिनोलेक्स, सिमेन्स यूएसए, प्रिव्ही जर्मनी, तसेच ऑस्ट्रियातील घनकचरा व्यवस्थापन कंपनीत काम करत अनुभव घेतला.
संदीप आसोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युरोपात दोन वर्षांपर्यंत पर्यावरणविषयक प्रकल्पांवर काम केले. यानंतर त्यांनी अमेरिकेतील नामांकित E&Y या कंपनीत कार्य केल्यानंतर भारतात परत येत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यभार सांभाळला.
स्वराजची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, ग्लासगो येथील जागतिक हवामान परिषदेमध्ये भारताचे सर्वात तरुण प्रतिनिधी म्हणून सहभाग. त्यानंतर त्यांनी UNDP (United Nations Development Programme) मध्येही काम करत आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवला. पुढे त्यांनी Peak Ventures या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये कार्य करत पुढील दिशा स्पष्ट केली.
स्वराजच्या यशामागे त्याची मेहनत, दृष्टिकोन आणि जागतिक पातळीवर कार्य करण्याची क्षमता यांचा मोठा वाटा आहे. त्याच्या १० वीमध्ये मिळालेल्या ९४% गुणांपासून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक शिक्षणसंस्थेतील यशापर्यंत पोहोचला आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता स्वराज दर महिन्याला एक दिवस ग्रामीण व कोकणातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देणार असून, त्यांच्या स्टार्टअपद्वारे नव्या संधी निर्माण करणार आहे. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी दिशा मिळणार आहे.