रत्नागिरी

Lok sabha Election 2024 Results : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंचा मोठा विजय

करण शिंदे

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. या मतदारसंघात तब्बल 47 वर्षांनंतर भाजपचं कमळ फुललं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. महायुतीच्या नारायण राणे यांनी 47 हजार 858 इतके मताधिक्य घेऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार विनायक राऊत यांच्यावर विजय मिळवला आहे. विनायक राऊत हे विद्यमान खासदार असताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या एमआयडीसी, मिरजोळे येथील गोदामात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात ही चुरशीची लढत रंगली होती. सुरूवातीच्या पहिल्या फेरीत विनायक राऊत 462 मतांनी आघाडीवर राहिले होते. त्यानंतर मात्र पुन्हा नारायण राणे यांनी तब्बल 2 हजार 305 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी राऊत यांनी तिसर्‍या फेरीत मोडीत काढली. यानंतर अवघ्या 30 मतांची आघाडी मिळविली होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले होते. मात्र, चौथ्या फेरीनंतर नारायण राणे यांनी आघाडी घेत ती अगदी 24 व्या फेरीपर्यंत ठेवली. मात्र, शेवटच्या 25 व्या फेरीत मात्र राणे 2 हजार मतांनी मागे आले. शेवटी 47 हजार 858 मतांनी राणे विजयी ठरले.

विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला 15 हजार 826 इतकी मते मिळाली. त्याचाही फटका राऊत यांना बसला आहे. त्याचबरोबर नोटाला 11 हजार 643 इतकी मते मिळाली आहेत. तर वंचित आघाडीचे अपक्ष उमेदवार मारूतीकाका जोशी यांना 10 हजार 39, अपक्ष उमेदवार राजेंद्र आयरे यांना 7 हजार 856, अशोक पवार यांना 5 हजार 280, सुरेश शिंदे यांना 2 हजार 247, अमृत तांबडे यांना 5 हजार 582 तर कोकण प्रादेशिक पक्षाचे उमेदवार शकील सावंत यांना 6 हजार 395 इतकी मतं मिळाली. टपाली मतांमध्ये मात्र विनायक राऊत यांनी बाजी मारली. त्यांना 4 हजार 132 मते मिळाली तर नारायण राणे यांना 3 हजार 175 टपाली मते मिळाली.

खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरेन : नारायण राणे

विजयाचा आनंद आहे. मी निवडून येण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिवस रात्र परिश्रम करून विजय खेचून आणला. लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला आहे. आता माझी नैतिक जबाबदारी आहे की, खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरेन. त्यांना अपेक्षित असलेले काम करेन, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT