चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये आपण एका कंपनीचे काम घेतले आहे. आपण एक बांधकाम अभियंता असून आपली कंपनी आहे. त्या माध्यमातून रितसर निविदा प्रक्रिया राबवून लोटे एमआयडीसीमधील विजय केमिकल्सचे काम आपण करीत आहोत. मात्र, हे काम थांबवा, अशी धमकी देऊन लोटे येथील सचिन काते याने आपल्या अभियंत्याकडे 10 लाखांची खंडणी मागितली, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी, पोलिसांनी खंडणीची तक्रार दाखल करून घेतली नसल्याबाबत लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
लोटे येथे घडलेल्या प्रकाराबाबत एक क्लिप व्हायरल करण्यात आली. ती क्लिप खरी की खोटी या बाबत पुढे आले नाही. त्यामुळे आपण ही पत्रकार परिषद घेत असल्याचे विक्रांत जाधव यांनी सांगितले. विजय केमिकल्सचा एक नवीन प्लान्ट सुरू होत आहे. या कंपनीचे निविदा प्रक्रिया राबवून आपण काम घेतले आहे. हे काम सुरू केल्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी सचिन काते आले व कामगारांना दमदाटी करू लागले. काम थांबवा, असे सांगितले. आमचे अभियंता दर्शन शिंदे यांनाही धमकी दिली. पुन्हा 30 ऑक्टोबर रोजी साईटवर येऊन दमदाटी केली. यावेळी शिंदे यांनी, तुमचे काही म्हणणे असेल ते आमच्या साहेबांना सांगा असे सांगितले. यानंतर पुन्हा सचिन काते याने साईटवर येणारा डम्पर अडविला व तत्काळ काम बंद करा, आम्ही स्थानिक आहोत. काम बंद झालेच पाहिजे, अशाप्रकारे धमकी दिली व कामगारांना मारहाण करू, असेही सांगितले.
त्यानंतर पुन्हा 31 ऑक्टोबर रोजी असाच प्रकार घडला. यानंतर 6 नोव्हेंबर रोजी सचिन काते व सचिन ताडकर, रोहन ताडकर हे या साईटवर आले व त्यांनी कामगारांना धमकी दिली. या प्रकरणी आपण त्यांना जाब विचारला. यावेळी त्याने, आपल्याला आत्ताच्या आत्ता 10 लाख रूपये द्या आणि काम करा. हे आम्हाला एकट्यासाठी नको. या ठिकाणी अरुण कदम व शशिकांत चव्हाण आहेत असे सांगून 10 लाखांची खंडणी मागितली. जर एका आमदाराच्या मुलाकडून अशाप्रकारे खंडणी मागण्यात येत असेल तर लोटे एमआयडीसीमध्ये काय प्रकार सुरू आहेत हे लक्षात येईल. लोटेमध्ये स्थानिकांची व्याख्या काय, असा सवालही विक्रांत जाधव यांनी केला.
खंडणीच्या गुन्ह्यांसाठी आम्ही खेडचे पोलिस निरीक्षक श्री. अहिरे यांच्याकडे गेलो व त्यांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी शशिकांत चव्हाण व अरुण कदम यांची नावे वगळा. तरच खंडणीचा गुन्हा दाखल करू असे सांगितले व अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. अखेर आम्ही ऑनलाईन फिर्याद दाखल केली असून लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहोत, असे सांगितले.